गोंदिया:- ७ लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने चळवळीतील त्रासाला कंटाळून २६ डिसेबंर रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यांनंद झा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम, वय (२७)रा. गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, तहसील- ऊसुर, पो. स्टे. पामेड, जिल्हा- बिजापुर (छ.ग.) (सदस्य तांडा दलम, मलाजखंड दलम, पामेड प्लाटून- ९चा समिती सदस्य ) असे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव आहे.
देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे.गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता गोंदिया जिल्हयात प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरीकांना देवून जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
आत्मसमर्पित माओवादी देवा ऊर्फ अर्जून ऊर्फ राकेश याचे मुळ गाव- बिजापूर जिल्हयातील अतिनक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पूर्वीपासूनच सशस्त्र गणवेशधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते.माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडुन त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासुनच तो नक्षल चळवळीत सहभागी होवून बाल संघटनमध्ये काम करीत होता. सन- २०१४ मध्ये तो पामेड दलम (दक्षीण बस्तर), जि. बिजापुर मध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले.पामेड दलम मध्ये ६ महिने काम केल्यानंतर सन- २०१४ चे अखेरीस त्याने अबुझमाड परिसरात अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले, ते पूर्ण केल्यानंतर त्यास सन २०१५ मध्ये माओवाद्यांचे बस्तर भागातून महाराष्ट्र- मध्यप्रदेश -छत्तीसगड झोनमध्ये पाठवले. सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन २०१५ ते १६ पर्यंत तांडा दलम व सन २०१६ ते १७ पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले.
हेही वाचा >>>एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
त्यादरम्यान मलाजखंड चा चंदु ऊर्फ देवचंद याचा अंगरक्षक म्हणून काम केले.सन- २०१८ मध्ये त्यास परत दक्षीण बस्तर भागात पाठवण्यात आले. २०१८ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत (माओवादी संघटना सोडण्यापर्यंत) त्याने पामेड प्लाटून क्रं. ९ मध्ये प्लाटून दलम सदस्य म्हणून काम केले.आत्मसमर्पीत माओवादी देवा हा सन २०१४ते २०१९ नक्षल संघटनेत कार्यरत असतांना टिपागड चकमक (जिल्हा गडचिरोली), झिलमिली काशीबहरा बकरकट्टा गोळीबार (जि. राजनांदगाव, छ.ग.), झिलमिली / मलैदा फॉरेस्ट कर्मचारी यांना मारहाण व चौकी जाळपोळ (जि. राजनांदगाव, छ.ग.), हत्तीगुडा / घोडापाठ गोळीबार (जि. राजनांदगाव, छ.ग.), किस्टाराम स्फोट (जि. सुकमा, छ.ग.), पामेड गोळीबार (जि. बिजापुर, छ.ग.) इत्यादी गुन्हयात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना दिली. गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासना तर्फे राबवण्यात येणारे प्रभावी नक्षल विरोधी अभियान व त्याबरोबरच शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेण्यासंबंधाने केलेल्या आवाहनाला अनुसरुन हिंसेचा मार्ग सोडुन समाजाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ होवुन सन्मानाने जिवन जगण्यासाठी सन-२००५ पासुन (आत्मसमर्पण योजना अंमलात आल्यापासुन) ते आजर्पत एकूण २३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवुन त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक संदीप पाटील,नक्षल विरोधी अभियान गडचिरोली परिक्षेत्राचे उप महानिरिक्षक अंकीत गोयल,जिल्हाधिकारी प्रजित नायर,पोलीस अधिक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.