भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे लपून बसलेल्या वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे नामक ४० वर्षीय नक्षलवाद्यास पोलिसांनी रविवार, २५ डिसेंबरला अटक केली. वत्ते ऊर्फ प्रदीप वड्डे हा घातपात करण्याच्या हेतूने नेलगुंडा या स्वगावी लपून होता. माहिती मिळताच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यास ताब्यात घेतले.
वत्ते हा १९९७ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला. सध्या तो भामरागड दलमचा सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ८ हत्या, ३ चकमकी, १ दरोडा आणि अन्य एक अशा १३ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गडचिरोली पोलीस दलाने जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत ६० नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
हेही वाचा: अंबादास दानवे यांच्या कार्यालयाची जागा कोणाची, सर्व बाहेर काढू; प्रवीण दरेकर
शिवाय ८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तर ३ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.