या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तो रुबाबदार आणि देखणा ‘होता’ म्हणायचे की ‘आहे’, अशी संभ्रमावस्था ‘जय’च्या बेपत्ता होण्याने निर्माण करून ठेवली आहे. जसे जसे दिवस जात आहेत तसे तसे त्याच्याविषयीच्या साऱ्या शंका एका कटू सत्याकडे वाटचाल करू लागल्या आहेत. मृत्यू हेच ते कटू सत्य. मात्र, वन्यजीवप्रेमींची मने ते मान्य करायला तयार नाहीत. आज ना उद्या त्याचा शोध लागेल, या आशेवर अनेक प्रेमी व स्वयंसेवी संस्थांचे थवेच्या थवे सध्या जंगल पालथे घालण्यात गुंतलेले आहेत. अगदी घरातीलच कुणीतरी हरवला, या इर्षेने ही शोधमोहीम राबवली जात आहे.

उमरेड-करांडलाचा जय तसा नशीबवानच म्हणायला हवा. त्याच्या बेपत्ता होण्याच्या चर्चेने माध्यमांचे वर्तुळ व्यापून गेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून, मंत्र्यांपर्यंत सारे मान्यवर काळजी करू नका, मिळेल जय, असा दिलासा आपल्या भाषणांमधून देत आहेत. बेपत्ता झाल्यावर व तो दिसत असताना सुद्धा जय कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिला. त्याचे नागपूरजवळ अधिवास करून राहणे प्रसिद्धीसाठी फायद्याचे ठरले. हे प्रेम व त्यातून मिळणारी प्रसिद्धी इतर वाघांच्या वाटय़ाला आली नाही. अलीकडच्या काही वर्षांत विदर्भातील तब्बल ३८ वाघ बेपत्ता झाले. त्यातील काहींची शिकार झाली, तर काहींचा शोध अजून लागलेला नाही. दूरचे कशाला, याच उमरेड-करांडला क्षेत्रातील चैतराम नावाचा वाघ काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. प्रसिद्धीच्या बाबतीत तो कमनशिबी ठरला. तो कुठे गेला, याचा शोध लागलाच नाही. वनखात्याने अजित नावाच्या शिकाऱ्याला पकडले तेव्हा त्याने चैतरामला ठार मारल्याची कबुली दिली आणि एका प्राण्याच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करणारी वनखात्यातील फाईल कायमची बंद झाली. वाघाच्या बेपत्ता होण्याला भरपूर प्रसिद्धी मिळणे, हे चांगलेच लक्षण आहे. समाज वन्यप्राण्यांच्या बाबतीत संवेदनशील होत आहे, हेच यातून दिसून येते. मात्र, अशा प्राण्यांच्या संदर्भात आपण नेहमीच असे संवेदनशील असतो का? त्याला पाहताना, न्याहाळताना अथवा जंगलातून फिरताना आपल्याकडून अनेक चुका होतात. त्याचे काय, हा यातला खरा प्रश्न आहे. व्याघ्र प्रकल्पातून फिरताना किती पर्यटक सरकारने आखून दिलेल्या लक्ष्मणरेषा पाळतात? वाघाला आणखी जवळून पाहण्याच्या नादात सारे नियम पायदळी तुडवायचे व तो हरवला की गळा काढायचा, हा दुटप्पीपणा नाही काय? व्याघ्र प्रकल्पात फिरताना अशी नियमभंगांची अनेक प्रकरणे दरवर्षी उघडकीला येतात. त्यावर चर्चा होते, कधी कधी दंड होतो. एखाद्या गाईडवर बंदी घातली जाते, पण असा नियमभंग करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होताना दिसते. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात दिवसेंदिवस हळवा होत चाललेला समाज या चुका का करतो?, या मुद्यावरही जयच्या निमित्ताने विचार व्हायला हरकत नाही. वाघ पाहून आल्यानंतर आनंदाच्या भरात अनेक पर्यटक त्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकतात. त्याचा ठावठिकाणा, अधिवासाची माहिती नको तेवढी सार्वजनिक करतात. अनेकदा हीच माहिती शिकाऱ्यांसाठी फायद्याची ठरते. काही प्रकरणात तर ते सिद्धही झाले आहे. तरीही पर्यटकांचे समाजमाध्यमांविषयीचे प्रेम काही आटताना दिसत नाही. वाघ बघितल्याच्या आनंदात असे भान हरपणे योग्य आहे का?, यावरही आता विचार होणे गरजेचे झाले आहे.

मुक्तसंचार हे प्रत्येक प्राण्याचे स्वातंत्र्य आहे. वाघ तर त्याच्याच मस्तीत जगतो. तरीही तो दिसला की, त्याला घेरण्याची पर्यटकांची सवय काही केल्या जात नाही. प्रत्येकालाच त्याला जवळून न्याहाळायचे असते, हे खरे पण, या नादात आपण त्याचीच कोंडी करत आहोत, याचेही भान पर्यटकांना राहत नाही. वाघ अथवा इतर वन्यप्राण्यांविषयीची आपली संवेदनशीलता सभ्यतेच्या दिशेने कधी वाटचाल करणार?, असा प्रश्न मग उपस्थित होतो. वाघांची इत्यंभूत माहिती वनखात्याला मिळावी म्हणून व्याघ्र प्रकल्पात अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यातून मिळणारी छायाचित्रे वाघांच्या हालचाली, त्यांचा वावर स्पष्ट करणारी असते. ही माहिती केवळ वनखात्याकडेच असावी, ती बाहेर कुठेही वितरित व्हायला नको, असा नियम आहे. व्याघ्र प्रकल्पात मुक्तसंचाराचा परवाना असलेल्या अनेक स्वयंसेवी संस्था ही माहिती बिनदिक्कतपणे सार्वजनिक करतात. अमूक एका वाघाचे ‘लोकेशन’ आम्हीच शोधून काढले, हे इतरांना सांगण्याच्या भरात ही आगळीक केली जाते. अनेकदा तर, इतरांपेक्षा आमची संस्था कशी सरस, हे सांगण्याच्या नादात ही कॅमेराट्रॅपची छायाचित्रे समाजमाध्यमात पसरवली जातात. हे फारच धोकादायक असते. आता त्याच संस्था जयच्या शोधात सर्वात पुढे आहेत. यानिमित्ताने या विरोधाभासावर सुद्धा चर्चा व्हायला हवी. दुर्दैवाने अशा संस्थांना वनखाते साधा जाब सुद्धा विचारत नाहीत, त्यामुळे इतरांची हिंमत वाढते. वाघ बेपत्ता होण्यावर हळहळ व्यक्त होत असताना या गंभीर नियमभंगावर कुणी चर्चा करताना दिसत नाही. जयच्या बेपत्ता होण्याला वारेमाप प्रसिद्धी मिळते आहे, हे बघून घरात यज्ञ करणे, त्याची बातमी माध्यमांना तत्परतेने पोहोचवून देणे, हा प्रकार वाहिनीवर कसा दिसेल, यासाठी धडपडणे अशा उठवळ प्रकारातून वाघांचे असे बेपत्ता होणे थांबणारे नाही. जय दिसत नाही, हे बघून प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चक्क कविता सुचली. ती प्रसिद्ध व्हावी, यासाठी त्यांचा आटापिटा सर्वाना बघायला मिळाला. हाच अधिकारी व्याघ्रसंरक्षण समितीच्या बैठकीला सुद्धा हजेरी लावत नाही. हाही उठवळपणाचाच एक प्रकार! ही असली थेर करून वाघ व मानवातील परस्पर सहचर्य घट्ट होणार नाही, हे वास्तव या निमित्ताने साऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रसिद्धी मिळते म्हणून वाघाविषयीचा खोटा कळवळा आणायचा, शोधमोहिमेत दिखाऊगिरी करायची, शोधाच्या प्रयत्नांना जाहिरातबाजीचे स्वरूप द्यायचे, असले प्रकार होत राहिले तर ती आपणच आपली केलेली फसवणूक ठरेल, याचे भान सर्वानी बाळगणे आता गरजेचे झाले आहे. सर्वाच्या सहभागातून वाघ वाढले, आता त्याला सांभाळायचे कसे, यावरही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड’ याच म्हणीचा प्रत्यय वारंवार येत राहील.

devendra.gawande@expressindia.com