वनखात्याची बेफिकिरी; वाघाच्या शोधासाठी गांभीर्याचा अभाव

वाघामुळे कोटय़वधी रुपयांची कमाई करणाऱ्या वनखात्याला बेपत्ता झालेल्या ‘जय’ नामक वाघाचा वर्षभरात शोध घेता आलेला नाही. यामुळे वनखात्याला वाघाशी काहीच देणेघेणे नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. एकीकडे वनखात्याला अत्याधुनिक करण्याचा चंग बांधायचा, वाघाच्या भरवशावर मिळालेल्या महसुलातून खाते अत्याधुनिक करायचे, पण वर्षभरात एक वाघ शोधता येत नसेल तर ही अत्याधुनिक यंत्रणा काय कामाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावणारा आणि अडथळ्यांची शर्यत पार करत नागझिरा अभयारण्य ते उमरेड-करांडला अभयारण्य असा प्रवास करणारा ‘जय’नामक वाघ बेपत्ता होऊन आज, १८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षांत ‘जय’बाबत वनखात्याची बेफिकिरी स्पष्ट झाली आहे.

मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्रप्रकल्पातील बेपत्ता झालेला ‘मुन्ना’ या वाघाचा शोध घेण्यास वन्यजीवप्रेमींच्या सहकार्याने तेथील वनखात्याला यश आले आहे. मात्र, महाराष्ट्रात वन्यजीवप्रेमींच्या प्रयत्नांना साद देण्याऐवजी सुरुवातीचे दोन महिने ‘जय’ बेपत्ता झाल्याचे लपवण्यात आले. पर्यटकांमुळे उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर तातडीने हालचाली करण्याऐवजी अधिकाऱ्यांची पाठराखण करण्यात काही महिने घालवण्यात आले. वन्यजीव गुन्हे शाखा, बेकायदा शिकार प्रतिबंधक पथक, फिरते पथक, विशेष व्याघ्र संरक्षण दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या धर्तीवर एक दल, अत्याधुनिक वाहने आणि इतर संसाधने असतानाही वनखात्याने ‘जय’चा गांभीर्याने शोध घेतलेला नाही. ‘जय’ला लावलेल्या रेडिओ कॉलरमधील तांत्रिक बाजूचा आधार घेत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, पण प्रसारमाध्यमांनी तो मोडीत काढला. त्यानंतर अभयारण्यात अधिक वाघ झाल्यामुळे ‘जय’ने अधिवास सोडल्याचे हास्यास्पद कारण वनखात्याकडून देण्यात आले. प्रकरणाच्या मुळाशी जाण्याऐवजी तो जिवंत आहे हे ठासून सांगण्यातच वनखात्याने शक्ती खर्ची घातली. ज्या उमरेड-करांडला अभयारण्यातून तो बेपत्ता झाला, त्या अभयारण्याची निर्मितीच वादाच्या भोवऱ्यात आली. गावकऱ्यांचा विरोध पत्करून आणि शक्य नसतानाही केवळ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीखातर हे अभयारण्य तयार करण्यात आले. एवढेच नव्हे तर लगोलग पर्यटनही सुरू झाले. यात वाघांच्या आणि विशेषत: ‘जय’च्या हल्ल्यात गावकऱ्यांची जनावरे बळी पडली. त्यामुळे गावकऱ्यांच्या द्वेषाला तो बळी पडण्याची शक्यता वन्यजीवप्रेमींनी वर्तवली, पण त्याकडेही साफ दुर्लक्ष झाले.

आश्वासनाचे काय झाले?

जागतिक व्याघ्रदिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘जय’ सापडेल, तो १०० टक्के सापडेल आणि वनखात्याचा ‘जय’ होईल, असे व्याघ्रप्रेमींना आश्वासित केले होते. तर त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘जय’चा इतिहास त्याच्या भटकंतीची साक्ष देतो. त्यामुळे आज ना उद्या तो सापडेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, वनमंत्र्यांचे आश्वासन आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास दोन्हीही हवेतच विरले.

  1. देशाच्या पंतप्रधानांना दखल घ्यायला लावणारा ‘जय’ बेपत्ता झाल्याची दखल ब्रिटनमधील ‘दि गार्डियन’ या वृत्तपत्राने घेतली. त्याच्या शोधासाठी वन्यजीवप्रेमींनी ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
  2. एवढेच नव्हे, तर वन्यजीवप्रेमींनी पंतप्रधानांपासून तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण अशा देशपातळीवरील तब्बल बारा यंत्रणांना ई-मेल पाठवले.
  • ‘जय’च्या भटकंतीचा वेग पाहता त्याची शिकार होऊ नये म्हणून सप्टेंबर २०१५ मध्ये त्याला पहिल्यांदा ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली. या कॉलरने काम करणे बंद केल्यानंतर मार्च २०१६ मध्ये भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक हबीब बिलाल यांनी त्याला दुसरी कॉलर लावली. दरम्यान, १८ एप्रिल २०१६ नंतर त्याचे या कॉलरचे सिग्नल्स मिळणे बंद झाले. कॉलर करणाऱ्या वैज्ञानिकांनी उच्च विद्युत दाबाच्या तारांखालून गेल्यामुळे कॉलर बंद पडल्याचे कारण दिले. मात्ऱ, इतरही वाघ ‘जय’ ज्या ठिकाणांहून गेला, त्याच ठिकाणांहून गेले होते. सॅटेलाइट बंद झाले तरी अ‍ॅन्टेनाच्या माध्यमातून शोध घेता येतो, पण हा प्रयत्नच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी केला नाही.
  • ‘जय’ बेपत्ता झाल्याचा मुद्दा खासदार नाना पटोले यांनी संसदेत उचलला, तेव्हा केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री अनिल दवे यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार हिवाळी अधिवेशनात हे पथक आले, पण पुढे काय झाले हे कुणालाही कळले नाही. ‘जय’ बेपत्ता होऊन तब्बल नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला जाग आली. प्राधिकरणाच्या बंगळुरू येथील विभागीय कार्यालयाचे महानिरीक्षक पी. एस. सोमशेखर, भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. कमर कुरेशी आणि केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेचे सहसंचालक कमल दत्त यांचा सहभाग असलेली एक समिती २० जानेवारी २०१७ ला नागपुरात येऊन गेली. या समितीनेही केंद्राला अहवाल सोपवणार असल्याचे सांगितले, पण त्याचेही पुढे काय झाले हे गुलदस्त्यातच आहे. ‘जय’वरून खासदार पटोले यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही.

जयच्या करामती                             

  • राष्ट्रीय महामार्ग, नदी, रेल्वे रूळ पार करून नागझिरा अभयारण्यातून ‘जय’ने उमरेड करांडला अभयारण्यात स्थलांतर केले. तासनतास् तो राष्ट्रीय महामार्गावर वाटसरूंचा रस्ता अडवून बसायचा.
  • साधारणपणे वाघ दोन वर्षांचे झाल्यानंतर शिकारीला सरावतात, पण ‘जय’ने अवघ्या पावणेदोन वर्षांतच नागझिऱ्यात मोठय़ा रानगव्याची शिकार केली होती. तृणभक्षी प्राण्यांपेक्षा पाळीव जनावर हे ‘जय’चे भक्ष्य होते.

Story img Loader