नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० ‘मेगावॅट’चे दोन संच, अशा एकूण १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाविरोधात ‘जय विदर्भ पार्टी’ आता मैदानात उतरली आहे. पक्षाकडून १३ जून ते १९ जून २०२३ पर्यंत नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीनंतरही येथील जनतेला त्याचा फायदा नाही. उलट महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटींचे कर्ज आहे. ते भरून काढण्यासाठी १ एप्रिलपासून वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले गेले. जय विदर्भ पार्टीकडून या वीज दरवाढ आणि कोराडीतील प्रस्तावित नवीन प्रकल्पाविरोधात १३ जून ते १९ जून २०२३ पर्यंत संविधान चौकात साखळी उपोषण केले जाणार आहे.
हेही वाचा – अमरावती : मेळघाटात भीषण अपघात टळला; बस दरीत उलटून झाडांना अडकली; चालकासह ७ प्रवासी जखमी
आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याची मागणीही पक्षातर्फे अरुण केदार, विष्णुपंत आष्टीकर, सुयोग निलदावार, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर यांनी केली. शासनाने ही मागणी मान्य न झाल्यास पुढे आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही जय विदर्भ पक्षाकडून दिला गेला आहे. कोराडीतील नवीन प्रकल्पामुळे कोराडी व नागपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदूषण वाढणार आहे. अगोदरच्या प्रकल्पामुळेच कोराडीच्या २० किमी परिसरात शेती करने अशक्य झाले आहे. सयंत्रामधून निघणाऱ्या राखेमुळे शेतीत पिकांचे उत्पादन घटले आहे. नागरिकांना श्वास, दमा, कॅन्सर, हृदयरोगासारख्या जीवघेण्या आजाराने त्रास होत आहे.
नवीन वीज निर्मिती सयंत्र स्थापित झाल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल होणार आहे. स्थानीय आमदार, खासदार यांनी या वीज प्रकल्पाचा विरोध केला नाही. कारण यामागे त्यांना मलाई मिळते, असा आरोपही जय विदर्भ पक्षाकडून केला गेला. विदर्भातील वीज दर निम्म्याने कमी करण्याची मागणीही यावेळी केली गेली.