नागपूर : कोराडीतील नवीन वीज प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी जय विदर्भ पक्षाने शनिवारी संविधान चौकात मुंडन आंदोलन केले. मुंडन करणाऱ्यांमध्ये जय विदर्भ पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर शहर महासचिव नरेश निमजे, विजय मोंदेकर, अशफाक रहमान, तारेश दुरुगकर, नीलकंठ अंभोरे यांचा समावेश होता. सरकारने तातडीने कोराडीच नव्हे विदर्भातील प्रस्तावित सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा याप्रसंगी जय विदर्भ पक्षाकडून दिला गेला.
संतप्त आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक म्हणाले, विदर्भात ७,२०० मेगावॅट वीज तयार होते. विदर्भाला केवळ २,२०० मेगावॅट लागते. उर्वरित वीज इतरत्र पाठवली जाते. कोळसा, जमीन, पाणी विदर्भातील वापरून वीज इतर राज्यांसाठी दिली जाते. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाने औष्णिक विद्युत प्रकल्प परिसरातील शेती खराब झाली आहे. प्रकल्पातील राखेमुळे नागरिकांना श्वास, दमा, कॅन्सर, हृदयरोगासारखे जीवघेणे आजार होत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही. या आंदोलनात अरुण केदार, विष्णूपंत आष्टीकर, अरविंद भोसले, प्रभाकर कोंडबत्तुनवार, ज्योती खांडेकर, ॲड. मृणाल मोरे आणि इतरांनी सहभाग घेतला.
हेही वाचा – नागपूर : पाचवीत प्रवेश हवा.. नऊ हजार रुपये मोजा.. ‘एसीबी’ची कारवाई कुणावर?
आज भजन आंदोलन
सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून उद्या रविवारी संविधान चौकात दुपारी २ वाजता भजन आंदोलन करण्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात आले.