नागपूर : कोराडीसह विदर्भात कुठेही नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारू नये म्हणून जय विदर्भ पार्टीकडून नागपुरातील संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी येथे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला बांगड्यांचा अहेर करण्यात आला.
जय विदर्भ पक्षाकडून १३ जूनपासून साखळी उपोषण सुरू आहे. या क्रमात आज १६ जूनला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या छायाचित्राला बांगड्यांचा अहेर दिला. यावेळी आंदोलक म्हणाले, महावितरणवर ६७ हजार ६४४ कोटींचे कर्ज आहे. ते भरून काढण्यासाठी १ एप्रिलपासून राज्यात वीज दरात ३७ टक्के वाढ करून जनतेचे कंबरडे मोडले जात आहे. विदर्भात आधीच मोठ्या प्रमाणावर औष्णिक वीज तयार होत असून त्यामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात पुन्हा नवीन प्रकल्पाची भर घालून विदर्भाला भकास करण्याचा घाट रचला जात आहे. कोराडीसह विदर्भात आता कोणताही नवीन प्रकल्प होऊ देणार नाही, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.
हेही वाचा – वारकऱ्यांसाठीच्या पथकरमाफीचा गैरफायदा?
दरम्यान, आंदोलकांनी आज शनिवारी संविधान चौक येथे दुपारी २ वाजता मुंडण आंदोलन करण्याचीही घोषणा केली. यावेळी अरुण केदार, मुकेश मासुरकर, अरविंद भोसले, महिला आघाडीच्या सुधा पावडे, ज्योती खांडेकर, ॲड. मृणाल मोरे, दीपाली मानमोडे, शोभा येवले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला किसान एकता संघ, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, विदर्भ विकास पार्टी, महाविदर्भ जनजागरण समिती, भारतीय शिक्षण संस्था, बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जाहीर समर्थन जाहीर केले आहे.