अमरावती : वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात राहणाऱ्या जैबुन्निसाची प्रकृती बिघडली. तिला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रक्ताची नितांत आवश्यकता असल्याने तिला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. रक्ताअभावी तिची प्रकृती चिंताजनक होत चालली असताना शंकरबाबा पापळकर यांनी सूत्रे हलवली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या प्रयत्नातून तिच्यावर लगेच उपचार झाले. जैबुन्निसाच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. शंकरबाबा पापळकर यांनी जैबुन्निसाला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
जैबुनिसा ही गेल्या १५ वर्षांआधी पुण्याच्या बाल कल्याण मंडळातून पोलिसांच्या माध्यमातून आजीवन पुनर्वसनासाठी वझ्झर येथे दाखल झाली, तेव्हापासून ती आजारी होती. तिच्या गळ्यामध्ये मोठी गाठ होती. २०११ मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व गळ्यातून ४ इंचाची गाठ काढण्यात आली, परंतु ती अशक्त असल्यामुळे दर चार ते पाच महिन्यांनी तिला रक्त द्यावे लागते. जिल्हा सामान्य रुग्नालयाचे मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने यांच्या देखरेखीखाली तिच्यावर मानसिक औषधोपचार सुरू आहेत.
हेही वाचा – शासनाकडून डी.एड, बी.एड धारकांची थट्टा, सेवानिवृत्त शिक्षक पुन्हा मानधन तत्वावर कामावर
गेल्या ८ जुलैला तिची प्रकृती बिघडल्यानंतर रक्ताची नितांत आवश्यकता होती. तिला सर्वांच्या प्रयत्नातून ७ बाटल्या रक्त देण्यात आले. तिची प्रकृती सुधारली असून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तिच्या भोजनाची व्यवस्था बिट्टू सलुजा, होजुबा गोरेवाला यांनी केली. माधुरी चेंडके यांनी जैबुन्निसाची सुश्रूषा केली. तिला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर निरोप देण्यासाठी डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, प्रीती मोरे, डॉ. प्रखर शर्मा, योगेश पानझडे, प्रमोद भक्ते, ज्योती सांगडे, श्रीमती रौराळ, लता सिरसाट आदी उपस्थित होते.