वर्धा : दोन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात आली अन् हिंगणघाटकरांनी एकच आनंद व्यक्त केला. करोना संक्रमण काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे सुरू करावे म्हणून सर्वत्र ओरड सुरू होती. काही थांबे पूर्ववत झाले. पण हिंगणघाट येथे थांबे सुरू न झाल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत होती.
खासदार रामदास तडस पाठपुरावा करून थकल्यानंतर, “जोपर्यंत गाड्या सुरू होणार नाही तोपर्यंत हिंगणघाट येथे पाय ठेवणार नाही,” अशी घोषणा करून बसले होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वांदीले यांनी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. अखेर तीन सुपर फास्ट गाड्या सुरू करणार असल्याचे रेल्वे प्रशासनास जाहीर करावे लागले.
आज, सोमवारी हिंगणघाटकरांसाठी तो सुदिन उगवला. जयपूर ते चेन्नई ही गाडी आज थांबणार म्हणून नागरिक फलाटावर जमा झाले. ढोलताशांचा गजर सुरू झाला. तेवढ्यात गाडी पोहचली. खासदार तडस व वांदीले यांनी गाडी चालकाचे स्वागत केले. यावेळी उपस्थित लोकांनी आनंद व्यक्त करीत तडस व वांदीले यांचे आभार मानले. या खेरीज अंदमान एक्स्प्रेस व गोरखपूर एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबणार आहेत.