नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. तेथील अथांग सुंदर समुद्राचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केले. या फोटोंवरून मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांवर वर्षद्वेषावरून टीका केली. यानंतर भारत विरुद्ध मालदीव असा संघर्ष सुरू झाला. या संपूर्ण प्रकरणात देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर त्यांनी त्यांचं मौन तोडलं असून नागपुरातील मंथन या कार्यक्रमात त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
“राजकारण हे राजकारण असतं. प्रत्येक देश भारताला पाठिंबा देईल किंवा भारतीयांशी सहमतच असेल याची मी खात्री देऊ शकत नाही. गेल्या १० वर्षांपासून आम्ही चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं एस. जयशंकर म्हणाले. ते नागपूर येथील टाऊन हॉलमध्ये आयोजित केलेल्या मंथन कार्यक्रमात बोलत होते.
मालदीव विरुद्ध लक्षद्वीप असा संघर्ष सुरू झाल्यापासून अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. मालदीवने भारतीयांवर टीका केल्यानंतर भारतानेही मालदीव पर्यटनावर बंदी आणली. परिणामी मालदीवच्या पर्यटनात घट झाली. मालदीवमध्ये जाणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटक भारताचे असतात. परंतु, भारतीय कंपन्यांनी मालदीवर बहिष्कार घातल्याने मालदीव पर्यटन कोंडी झाली आहे. त्यामुळे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी चीनकडे पर्यटकांची मागणी केली. चीनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चीनने मालदीवमध्ये पर्यटक पाठवावेत अशी मागणी केली.
हेही वाचा >> भारत-मालदीव तणावादरम्यान मोहम्मद मुइज्जूंचा मोदी सरकारला इशारा, १५ मार्चचा अल्टीमेटम देत म्हणाले…
मालदीवमधी भारतीय लष्कर हटवण्यासाठी अल्टिमेटम
त्यामुळे, भारतीयांकडून कमी झालेला पर्यटकांचा ओघ चीनकडून वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या दौऱ्यावरून परतताच राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी भारताला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. भारताने १५ मार्चआधी मालदीवमधून आपलं सैनिक हटवावं, असं मोईज्जू म्हणाले आहेत. याआधी ते म्हणाले होते, कोणीही आम्हाला धमकावण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या अनेक वर्षांपासून भारताची एक मोठी सैन्यतुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवमधील आधीच्या सरकारने केलेल्या विनंतीनंतर भारताने मालदीवमध्ये एक सैन्यतुकडी तैनात केली होती. तेथील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतल्या बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराने एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. परंतु, नव्या सरकारने भारताला आपलं सैन्य परत बोलावण्यास सांगितलं आहे.