चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात “जल जीवन मिशन” कार्यक्रमांतर्गत एक हजार कोटी रूपयांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या देखरेखीखाली सुरू होती. त्यांना लाच घेताना पकडल्याने ही सर्वच कामे संशयाच्या भोवऱ्यात आहेत.पाच गावातील ४३ लाखाच्या बिलांसाठी हर्ष बोहरे यांनी ४ लाख २० हजारांची लाच स्वीकारली. एक हजार कोटींची कामे बघता “जल जीवन मिशन” मधील हे लाच प्रकरण गंभीर असल्याचे सांगण्यात येते. बोहरे यांची पोलीस कोठडीत रवानगी होताच त्यांचा पदभार उपअभियंता बारहाते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुनील गुंडावार व परिचर मतीन शेख या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ४ लाख २० हजारांची लाच स्वीकारतांना शुक्रवारी अटक केली. या अटकेनंतर तिघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार व लाच प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. एका कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी परवठा विभागात जल जीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण एक हजार कोटी रूपयांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या मार्गदर्शनातच सुरू होती. विशेष म्हणजे प्रत्येक कामासाठी बोहरे कंत्राटदाराकडून बिल निघण्यापूर्वीच टक्केवारी घेवून मोकळे व्हायचे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
एखाद्याने झालेल्या कामाची टक्केवारी दिली नाही तर त्याचे बिल अडवून धरायचे असा नित्यक्रम होता. जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिंपरी तसेच इतरही तालुक्यांमध्ये जल जीवन मिशनची १२९० योजनांची कामे सुरू आहेत. या प्रत्येक कामासाठी बोहरे कंत्राटदाराकडे पैशासाठी तगादा लावत होते. चार लाख २० हजाराचे लाच प्रकरणात बोहरे यांनी जिवती आणि राजुरा तालुका येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते. त्यापैकी केवळ ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. याच कामासाठी ही लाच स्वीकारली गेली आहे.
४३ लाखाचे कामासाठी अधिकारी ४ लाख २० हजाराची लाच स्वीकारत असेल तर जिल्ह्यात जल जीवन मिशनची एक हजार कोटींची कामे सुरू आहेत. ही एक हजार कोटींची कामे बघता लाच प्रकरणाची व्याप्ती ही फार मोठी आहे. विशेष म्हणजे या लाच प्रकरणात कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे एकटे नाही तर त्यांना जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचाही आशिर्वाद व सहकार्य आहे अशी चर्चा सुरू आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन याना विचारणा केली असता जल जीवन मिशनची ७०० कोटींची कामे जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे ही सर्व कामे ग्रामीण भागात सुरू आहेत. लाच प्रकरणानंतर कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्याकडून पदभार काढून टाकण्यात आला असून त्यांचे पदाची सूत्रे उपअभियंता बारहाते यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती दिली. दरम्यान बोहरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. तसेच त्यांच्या चंद्रपूरातील व इतरही ठिकाणच्या निवासस्थानाची तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.