बुलढाणा: रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील कार्यक्रमात प्रस्तावित जालना-जळगाव व जालना-खामगाव रेल्वेमार्गाविषयी केलेली विधाने त्या कार्यक्रमापुरतीच मर्यादित होती. समाज माध्यमांवर त्यांच्या विधानाचा विपर्यास करून माहिती प्रसारित करण्यात आली. यामुळे प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वेमार्गावर कोणताही परिणाम होणार नसून हा मार्ग होणारच, असा दावा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.
हेही वाचा >>> भंडारा कारागृहात ‘शोले स्टाईल’ ड्रामा; कैदी चढला झाडावर,‘‘मग झाले असे काही की…”
मराठवाड्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रेल्वेराज्यमंत्री दानवे यांनी जालना-खामगाव रेल्वेमार्गाबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते. स्थानिक शासकीय विश्रामगृहात याबाबत बोलताना जाधव म्हणाले, येत्या २९ ऑक्टोबरला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत या मार्गाबाबत चर्चा करू. जालना-खामगाव रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात आहे. यासाठी ३ कोटी ८७ लाख रुपये मंजूर झाले असून मालवाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग फायदेशीर ठरणारा आहे. मार्गासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च लागणार असून राज्य सरकार ५० टक्के वाटा उचलणार आहे. या मार्गावर जालना, कचरेवाडी, रणमूर्ती, न्हाव्हा (जालना) तर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, देऊळगाव मही, अंढेरा, मेरा, चिखली, दहिवडी, अमडापुर, उदयनगर, पाळा, जळका तेली, नवीन खामगाव ही स्थानके राहणार आहेत. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण २००९ पासून प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
धनुष्यबाण आम्हालाच मिळणार
भाजप शिंदे गटाला दवाबाखाली ठेवत असल्याबद्दल व मिशन ४५ बद्दलही खा. जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना एकत्र असतानाच भाजपने हे मिशन आखले होते. भविष्यात भाजप-शिवसेना युती नाहीच, असे गृहीत धरून ही मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, आता भाजप नेत्यांनी मित्रपक्षांनी विचलित व्हायचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आपणच उमेदवार राहणार असून कमळावर नव्हे तर शिंदे गटाच्या चिन्हावरच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, असा दावाही त्यांनी केला.