लोकसत्ता टीम
बुलढाणा : अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याने महावितरणकडे तक्रार, निवेदन दिले. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले. दरम्यान, पालकमंत्री जिल्ह्यात असताना सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.
आंदोलकांमध्ये चिखली तालुक्यातील डोंगरगाव, सावरखेड बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. डोंगरगाव येथील पाझर तलावात त्यांनी ठिय्या मांडला. शेतकऱ्यांनी आठवडाभरापूर्वी वीज समस्येबाबत महावितरणला निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणत्याही उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘आधीच दुष्काळ आहे, त्यात अपुरा वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय,’ अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.