लोकसत्ता टीम
नागपूर: कुही तालुक्यातील मांढळमधील एका मुलीने जांभळाची बी गिळली. ती अन्ननलिकेत अडकल्यावर तिची खालावणारी प्रकृती बघत तिला सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी गुंतागुंतीची प्रक्रिया करून जांभळाची बी आणि आत अडकलेला शेंगदाणाही बाहेर काढला.
सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, लक्ष्मी (बदललेले नाव) या मुलीची अन्न आणि श्वासनलिका जन्मापासूनच निमुळती होती. त्यामुळे तिच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली. त्यामुळे अन्ननलिका थोडी लहान झाली. मंगळवारी तिने जांभळाची बी गिळली. ही बी तिच्या अन्ननलिकेत अडकली. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. तिला सुपरमध्ये आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता जांभळाच्या बी सोबतच शेंगदाणाही अडकलेला दिसला. बालरोग शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सावजी, गॅस्ट्रो इंट्रॉलॉजीचे डॉ. अमोल समर्थ यांनी इंडोस्कोप टाकून जांभळाची बी आणि शेंगदाणा देखील बाहेर काढला.