सार्वजनिक व राजकीय जीवनात सक्रिय राहून सुद्धा मनात येईल ते बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि तरीही अनेक वर्षे जनमानसावर अधिराज्य गाजवणारे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे कदाचित एकमेव राजकारणी असावेत. त्यांची दखल घेण्याचे कारण त्यांनी नुकतीच केलेली एक घोषणा आहे. परवा अमरावतीला झालेल्या सभेत त्यांनी आता भविष्यात स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर जाहीरपणे काहीही बोलणार नाही असे जाहीर करून टाकले. विदर्भाच्या प्रश्नावर सार्वजनिक मौन पाळण्याच्या त्यांच्या या भूमिकेची माध्यमांनी दखलच घेतली नाही. माध्यमांचा सारा फोकस सध्या अ‍ॅड. श्रीहरी अणेंकडे वळला आहे. अमरावतीच्या सभेत हे दोघेही होते पण प्रसिद्धी अणेंना मिळाली व धोटेंची घोषणा दुर्लक्षित राहिली. बोलण्यात आणि वागण्यात ‘वाघ’ असलेले धोटे आता विदर्भाच्या आंदोलनात सोबत करतील पण बोलणार नाही, हे विदर्भवाद्यांसाठी पचायला थोडे जड आहे. धोटे म्हणजे धगधगता अंगार! विदर्भाची मागणी तशी जुनी पण त्याला जनसमर्थन मिळवून देण्यात सिंहाचा वाटा धोटेंचा होता, ही बाब त्यांचे विरोधकही मान्य करतील. एकेकाळी साऱ्या विदर्भाने डोक्यावर घेतलेल्या या वाघाला नंतर हे समर्थन टिकवता आले नाही. राजकारणात अनेक तडजोडी करत त्यांनी जनतेचा विश्वास गमावला मात्र धोटेंच्या प्रखर व्यक्तिमत्त्वाची लोकप्रियता कायम राहिली. जनता धोटेंना भलेही मत देणार नाही पण त्यांचे विचार ऐकायला जरूर जाईल असे चित्र विदर्भात अनेक ठिकाणी दिसत राहिले. वय झाले की माणूस थकतो. गात्रे शिथिल होतात. आधीची तडफ राहत नाही. धोटेंनी मात्र आपण राजकारणातून बाद झालो असे कधीही मानले नाही. वाघ कधीच म्हातारा होत नसतो या वाक्यावर त्यांचा ठाम विश्वास होता व आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पांढरे शुभ्र कपडे, काळेशार केस व दाढी असा त्यांचा वेष असायचा. आपले छायाचित्र याच पेहरावात हवे यासाठी ते आग्रही असायचे. नंतर त्यांनी अचानक केस रंगवणे सोडून दिले. त्यांची पांढऱ्याशुभ्र केसातली छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि विदर्भाचा वाघ म्हातारा झाला अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. त्याकडे दुर्लक्ष करत ही मुलूखमैदानी तोफ संधी मिळेल तिथे विदर्भाच्या प्रश्नावर धडधडतच राहिली. जे बोलायचे आहे ते थेट बोलणे, कोणताही आडपडदा न ठेवता बोलणे हे त्यांचे खास वैशिष्टय़. त्यामुळे या वाघाच्या वाणीने घायाळ झालेल्यांची संख्याही बरीच मोठी. तरीही त्यांनी कधीच कुणाची फिकीर केली नाही. विधानसभा असो वा लोकसभा, कोणतेही नियम न पाळता बोलण्याचा अधिकार गाजवण्याच्या धोटेंच्या पराक्रमामुळे ते अनेकदा अडचणीत आले. तरीही त्यांनी स्वभावाला मुरड कधी घातली नाही. क्रोध हे धोटेंच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्टय़. त्यांच्या कोपाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. यातून त्यांचे सहकारी सुटले नाहीच पण विधिमंडळातले आमदारही सुटले नाहीत. रागाच्या भरात विधानसभेत पेपरवेट फेकून मारणारे व त्यासाठी आमदारकी गमावणारे ते देशातले बहुदा एकमेव आमदार असावेत. कायम कोपभवनात वावरणाऱ्या या वाघाने अनेकांवर प्रेमही तसेच केले. राजकारणात तडजोडी करताना प्रसंगी राजकीय भूमिका मोडीत काढण्याचे धारिष्टय़ दाखवणाऱ्या धोटेंनी अडचणीत आलेल्या अनेकांना साथ दिली. इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे ही त्यातली मोठी उदाहरणे. या भूमिका मोडीत काढण्याच्या सवयीमुळे त्यांचे अनेक खंदे शिलेदार त्यांना सोडून गेले. मात्र कधीही त्यांनी याविषयी हळहळ व्यक्त केली नाही. आपल्याच भूमिका बदलामुळे आपण जनसमर्थन गमावून बसलो या वास्तवाकडे कायमची डोळेझाक करत हा विदर्भवीर सतत स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडत आला आहे. त्यामुळे आता अणेंनी विदर्भाची भूमिका स्वीकारल्यानंतर धोटेंनी आळवलेला मौनराग अनेकांना अस्वस्थ करणारा व या वाघाच्या आधीच्या गर्जनांचा आठव आणणारा आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसोबत लोक किती आहेत व किती नाहीत हा मुद्दा बाजूला ठेवला तरी गेल्या सहा दशकातील प्रत्येक निवडणूक याच प्रश्नावर लढणारे व त्यासाठी अनेक पक्षांतरे करणारे धोटे एकमेव आहेत. सभेला लोक कितीही जमलेले असोत, विदर्भाच्या मागणीसाठी सभा असली की प्रमुख भाषण धोटेंचे, हे गणित ठरलेले असायचे. आता कालपरत्वे धोटे प्रमुख वक्तयाच्या भूमिकेतून हळूच सभेच्या अध्यक्षस्थानावर सरकले आहेत. अणेंच्या बहुतांश सभेत सध्या धोटेच अध्यक्ष राहतात. अशाच एका सभेत त्यांनी केलेली मौनाची भाषा आता चर्चेचा विषय ठरली आहे. धोटेंचे प्रत्येक भाषण म्हणजे जळत्या आगीतला निखाराच. त्याची सवयही सामान्यजनांना होऊन गेलेली. आता नव्या भूमिकेत ते बोलतील पण त्यात विदर्भ असणार नाही. राजकारणात उतारवयाचा काळ सुरू झाला की अनेकजण मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातात. कदाचित धोटेंना या मौनातून हेच तर सुचवायचे नाही ना, अशी शंका आता यायला लागली आहे. राजकारणात एखादे वक्तव्य अंगावर उलटले तर माघार घ्यावी लागते. त्यातच शहाणपण असते असा समज प्रचलित आहे. आजवर अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या धोटेंनी कधीच अशी माघार घेतली नाही. जे बोललो त्यावर ठाम अशीच त्यांची भूमिका राहिली. यासाठी त्यांना जबर किंमत चुकवावी लागली पण धोटे बधले नाहीत. विदर्भासाठी नक्षलवाद्यांची मदत घेईन या त्यांच्या वक्तव्यावरून गुन्हे दाखल झाले पण धोटे ठामच राहिले. माणूस हा पृथ्वीवरचा सर्वात बदमाश प्राणी आहे असे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या या नेत्याच्या मौनावर विदर्भवादी चिंतन करतील, त्यांचे मन वळवतील की त्यांच्या भूमिकेचा सन्मान राखत त्यांना ज्येष्ठत्व बहाल करत सोबत ठेवतील हे नजीकच्या काळात बघणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देवेंद्र गावंडे – devendra.gawande @expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा