वर्धा : उद्योग जगतात बजाज हे मोठे नाव समजल्या जाते. दिवं. राहुल बजाज यांनी सचोटी व अस्सलता म्हणून या उदयोगविश्वास पुढे नेल्याचे म्हटल्या जाते. म्हणूनच ‘हमारा बजाज’ ही टॅगलाईन लोकप्रिय ठरली होती. आता पण याचीच पावती मिळत आहे. जमनालाल बजाज सेवा संस्था विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित असते. आता सिंचनासाठी विहिरी खोदून देण्यात बजाज सेवा संस्थेने पुढाकार घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे उपक्रम?

कोरडवाहू शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा वारंवार फटका बसतो. त्यामुळे उत्पन्न होत नाही आणि कर्जाचा विळखा घट्ट होतो. या चक्रातून सोडविण्यासाठी जमनालाल बजाज सेवा संस्थेने पुढाकार घेतला आहे. विहिरीचे खोदकाम करण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळतो. मात्र पाच ते दहा एकर शेती असणाऱ्यांना हा लाभ दिल्या जात नाही. शेतीचे तुकडे करता येत नाही. अशा विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना बजाज संस्था मदत करणार. या संस्थेने पाच ते पंधरा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकाम करून देणे सुरू केले आहे. बजाज संस्थेच्या बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय व आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतनचे तज्ञ हे विहिर खोदण्यासाठी शेतातील योग्य जागेची निवड करतात.

निवड झालेल्या जागेवर ४० फुट खोल खोदकाम केले जाते. आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना विहिरी खोदून मिळाल्या आहेत. समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा व देवळी तालुक्यातील हे शेतकरी आहेत. दर आठवड्याला चार विहिरी खोदून देण्याचे नियोजन आहे. या वर्षी ५० व पुढील वर्षी १०० विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट्य आहे. खोदकामात दहा टक्के वाटा शेतकऱ्याचा असून नव्वद टक्के वाटा संस्था उचलत आहे.

वर्षांतून दोनदा उत्पन्न शक्य

या निमित्ताने आयोजीत शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव म्हणाले की, हा आमचा शेतकऱ्यांसाठी ‘ऑल इज वेल’ उपक्रम आहे. शेतशिवारात पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालू शकत नसल्याने शासकीय योजनावंचीत शेतकऱ्यांना विहिरी खोदून देण्याचे ध्येय ठेवल्याचे भार्गव म्हणाले. तर योजनेचे लाभार्थी शेतकरी आंबोडा येथील अमोल ठाकरे हे म्हणाले की, कोरडवाहू शेती असल्याने फारसे उत्पन्न मिळत नाही. विहीर खोदने पैशांअभावी शक्य नव्हते. मात्र आता बजाज संस्थेच्या मदतीने शेतात विहिर झाल्याने वर्षातून दोनदा उत्पन्न घेणे शक्य होणार.

Story img Loader