मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील २१ गावांमधून जनजागृती
मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्याचे स्वरूप मोठे होत आहे. भविष्यात अभयारण्यालगतच्या गावांमधून मानव-वन्यजीव संघर्ष ही समस्या वाढण्याची शक्यता आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी या गावांमधून विशेषत: शाळांमधून वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊनच सातपुडा फाऊंडेशन, आकोट वन्यजीव विभाग व निसर्गकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा, वान व अंबाबरवा अभयारण्यालगतच्या २१ गावांमधून जनजागृती करण्यासाठी ‘जन-वन चेतना रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार २डिसेंबरपासून रॅलीची सुरूवात होणार असून ४ डिसेंबरला त्याची सांगता होईल.
राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य व सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे व आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा उद्या २ डिसेंबरला सकाळी मलकापूर गोंड व्हिलेज येथून रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करतील. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफरमधील गावातून सुरू झालेला मानव-वन्यजीव संघर्ष आज सर्वच अभयारण्याच्या बफरक्षेत्रातील गावांमध्ये सुरू झाला आहे. तो वाढू नये आणि त्यावर नियंत्रण मिळवता यावे म्हणून आयोजित रॅलीच्या माध्यमातून गावागावात शिकारी कशा होतात, शिकाऱ्यांचे सापळे, शिकाऱ्यांना रोखण्यासाठी काय करावे आदींची पोस्टर्स लावून गावकऱ्यांना माहिती देण्यात येईल. वाघ आणि मानव यांच्यातील संवादावर पथनाटय़ तयार करण्यात आले आहे. गावकऱ्यांना त्यांच्या समस्या विचारून त्यांच्याशी चर्चा करून त्यावरचे पर्याय त्यांना सुचवले जातील. या रॅलीत प्रामुख्याने अभयारण्यालगतच्या सीमेवरील गावे निवडण्यात आली आहेत. सकाळी गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांशी संवाद आणि दुपारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे, तसेच ज्या गावात रात्र होईल, त्या गावात चित्रफितीच्या माध्यमातून त्यांना मानव-वन्यजीव संघर्ष आणि संबंधित गोष्टींची माहिती देण्यात येईल. रॅलीची सुरुवात जंगलांमधून होणार असून परतताना बाहेरच्या मार्गाने रॅली परतणार आहे. म्हणूनच त्यासाठी इंधनयुक्त वाहनांचा वापर न करता सायकलींचा वापर करण्यात येणार असल्याचे निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले. रॅली मलाकापूर गोंड, शहानूर, धारूळ, रामापूर, बोर्डी, शिवपूर, रामापूर, शहापूर, करी, चिपी, धोडाआखार, भिली, चंदनपूर, चिचारी, दिवणझरी, झरीबाजार, उमरशेवडी, पिंपरखेड, वारी, सायखेडा, शहापूर, वसाली व आकोट या मार्गावरून जाणार आहे. रॅलीत निसर्गकट्टाचे गौरव झटाले, प्रेम अवचट, विजय पवार, शिवा इंगळे, निसर्ग संरक्षण संस्थेचे राहुल काळमेघ, शिक्षक संतोष पुरी आदी सहभागी होत असून रॅलीचे नेतृत्त्व अमोल सावंत करणार आहेत. ४ डिसेंबरला रॅलीची सांगता करण्यात येईल.

Story img Loader