लोकसत्ता टीम
भंडारा : मोहाडी तालुक्यातील पाचगाव स्थित जवाहर नवोदय विद्यालयात भर उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाणी नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंघोळ केलेली नाही. नवोदय विद्यालय प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.
अनेक दिव्य पार करत सात वर्षापूर्वी नवोदय विद्यालय पाचगाव येथे सुरू करण्यात आले. सध्या ४२८ विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असताना विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रविवारी विद्यार्थ्यांचे पालक विद्यालयात आणि वसतीगृहात आपल्या पाल्यांना भेटण्यासाठी आले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. संतप्त पालकांनी याची तक्रार खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडे केली. खासदार पडोळे यांनी रविवारी नवोदय विद्यालय गाठले आणि पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या. खासदार पडोळे यांनी विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्यांचा पाढा सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर खासदारांनी विद्यालयाच्या प्राचार्यांना चांगलेच धारेवर धरले. मागील पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी आरडाओरडा करीत आहेत मात्र विद्यालय प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. पाण्याअभावी पाच दिवसापासून येथील विद्यार्थ्यांनी आंघोळ देखील केली नाही. स्वच्छतागृह आणि वॉश बेसिन अस्वच्छ असून दुर्गंधी पसरली आहे. परिसरात कुठेही साफसफाई दिसून आली नाही. प्रकृती बिघडली असता येथील प्राचार्य सुट्टी देत नसल्याचेही विद्यार्थ्यांनी खासदार पडोळे यांना सांगितले.
रविवारी पालक विद्यालयात आले असता विद्यालयाची परिस्थिती बघता काही पालकांनी आपल्या पाल्यांना स्वागवी नेण्याचा निर्णय घेतला. काही पालकांनी सांगितले की त्यांचे घर विद्यालयापासून काहीच किलोमीटर अंतरावर असल्याने १५ दिवसापासून ते पाल्यांना घरून पिण्याचे पाणी आणून देत आहेत. पाण्याअभावी स्वच्छतागृह आणि स्नानगृहात अस्वच्छता असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. या सर्व प्रकारामुळे रोगराई पसरून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे अशी तक्रार पालकांनी केली. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश भंडारा जिल्हाधिकारी यांना खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. यावेळी माजी सिनेट सदस्य प्रविण उदापुरे , महेश कलंबे, उमेश मोहतुरे, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सध्या पाणीटंचाई निर्माण झाली असली तरी ३ एप्रिल पासून आम्ही दररोज टॅंकरने पाणी आणत आहोत. शिवाय पिण्यासाठी पाच ते सहा पाण्याच्या कॅन रोज मागविल्या जात आहे. काल सुट्टीचा दिवस असल्याने काही कर्मचारी रजेवर गेले होते. त्यामुळे अस्वच्छता दिसली. ज्या काही त्रुटी असतील त्या भरून काढून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहे. -उषा धारगावे, प्राचार्य, नवोदय विद्यालय, पाचगाव, भंडारा.
मागील पंधरा दिवसापासून ही समस्या उद्भवली असताना येथील प्राचार्यांनी कोणतीही पर्यायी व्यवस्था विद्यार्थ्यांना करून दिलेली नाही, ही शोकांतिका आहे. आमच्यासमोर प्राचार्य विद्यार्थ्यांना बोलण्यास मनाई करत होते. यावरून प्राचार्यांची दबंगगिरी दिसून येते. मात्र, विद्यार्थ्यांना सुविधा व उपाययोजना पुरविण्यात प्राचार्यांचे दुर्लक्ष आहे. -डॉ. प्रशांत पडोळे, खासदार, भंडारा.
भंडारा जिल्हाधिकारी स्वतः नवोदय विद्यालयाचे प्रमुख आहे. मात्र, त्यांचेही याकडे दुर्लक्ष दिसून येते. जिल्हाधिकारी भंडारा यांनी तातडीने नवोदय विद्यालय पाचगाव येथे भेट देऊन ही गंभीर बाब जाणून घेतली पाहिजे. प्राचार्याच्या दबावामुळे विद्यार्थी बोलू शकत नाही, असेही निदर्शनास आले. काही विद्यार्थी मात्र हिमतीने पुढे आले आणि शाळेतील, वसतिगृहातील सत्य परिस्थिती सांगितली. -प्रवीण उदापूरे, माजी सिनेट सदस्य.