गडचिरोली : गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे घटनास्थळ आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये काही नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. यावेळी अचानक जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर परिसरात झडती घेतली असता सात नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. तेथे एके-४७, एसएलआरसह इतर नक्षल शस्त्र व साहित्य आढळून आले. ते जवानांनी ताब्यात घेतले आहे.त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. सर्व जवान सुरक्षित आहेत. या वर्षभरात छत्तीसगडमध्ये झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत तब्बल १६५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर ६६९ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून ६५६ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांची कंपनी ६ आणि बस्तर डिव्हिजनचे ४० पेक्षा अधिक नक्षलवादी मारले गेले आहे. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. त्यामुळे मृत नक्षलवादी संख्या वाढण्याची शक्यता छत्तीसगड पोलिसांनी वर्तवली आहे.

हे ही वाचा…“लोकसभेत जमिनीवर आले म्हणून बहिणी लाडक्या झाल्या! दीड हजार दिले , पाच हजार उकळले”, रोहिणी खडसे यांची टीका

छत्तीसगडच्या दंतेवाडा- नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये जवान व नक्षल्यांत ४ ऑक्टोबरला जोरदार चकमक उडाली. यात सात नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.

गडचिरोली कनेक्शनची चौकशी सुरु

अबूझमाड हा नक्षल्यांचा बालेकिल्ला असून गडचिरोलीत तेथूनच मोठ्या प्रमाणात घातपाती कारवायांचा कट रचला जातो. या पार्श्वभूमीवर शेजारच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सात नक्षल्यांचे गडचिरोली ‘कनेक्शन’ आहे का, याची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘एफओबी’ मुळे नक्षलवाद्यांची कोंडी

नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात गुप्तचरावर आधारित कारवाईसाठी तसेच दुर्गम गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी नागरी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) उघडण्यास गती दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून ३३ एफओबी स्थापन करण्यात आले आहेत. या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे.

हे ही वाचा…“महाराष्ट्राची मान शरमेने खाली, हे सरकार फक्त मलई खाण्यात…”, पटोलेंकडून टीकांचा भडिमार

बालेकिल्ल्यातच हादरा

अबूझमाडच्या जंगलात माओवाद्यांची नेहमीच हुकूमत राहिलेली आहे. मात्र, दक्षिण अबूझमाडमध्ये छत्तीसगडच्या जवानांनी सात नक्षल्यांनला कंठस्नान घालून माओवाद्यांना मोठा हादरा दिला आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

या चकमकीबाबत माहिती मिळाली आहे, पण अद्याप संबंधित नक्षल्यांचा गडचिरोलीशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु आहे.- नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawans killed seven naxalites during encounter in chhattisgarhs dantewada ssp 89 sud 02