नागपूर : महाराष्ट्रात आघाडी झाली पाहिजे म्हणून शरद पवार यांनी विद्यमान चार खासदार असताना देखील १० जागांवर समाधान मानले. तुमचा एक खासदार असताना १७ जागा मिळाल्या, तरी समाधानी नसाल तर जरा अवघड होईल. काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीने वर्धेची जागा हिसकावून घेतली, असे वाटते. हा न्यूनगंड बाजूला ठेवा, आता आपली मजबूत आघाडी आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला दिला.
महाविकास आघाडीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांची प्रचारसभा पूर्व नागुपरातील वर्धामान नगरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रकाश गजभिये, दुनेश्वर पेठे यावेळी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, आपण अमरावती, भंडारा-गोंदिया आणि बुलढाणा या तीन जागा आघाडी म्हणून लढवायचो. शरद पवारांनी आघाडी झाली पाहिजे म्हणून चार खासदार असतानाही दहा जागांवर समाधान मानले. तुमचा एकच खासदार होता, तरीही १७ जागांपर्यंत पोहोचलात. एवढे होऊनही समाधानी नाही म्हटल्यावर जरा अवघड आहे.
हेही वाचा >>>महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू; आर्णीतील कवठा बाजार येथील घटना
आमची रामटेकची हुकूमी जागा होती. पण ती आम्ही सोडून दिली. किती त्याग करायचा. पण आता आघाडी झाली आहे. ठामपणाने सर्व घटक पक्ष काम करीत आहे. कोणतेही मतभेद राहिले नाहीत. काँग्रेस पक्षाने अतिशय चांगला जाहीरनामा मांडला आहे. आजपर्यंत इतका उत्तम जाहीरनामा कोणत्याही पक्षाने काढलेला नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
भाजप सरकारने केलेल्या चुका भरून काढण्याचे काम या जाहीरनाम्यातून होणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. त्यामुळे आयआयटी पवई, मुंबई येथील ३६ टक्के मुलांनादेखील नोकऱ्या मिळत नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राची गुंतवणुकीत अधोगती
महाराष्ट्राची गुंतवणुकीत अधोगती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा करतात आणि त्याचबरोबर २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा करतात. हा विरोधाभास आहे, याकडे जयंत पटेल यांनी लक्ष वेधले.