नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा न्यायालयाचा प्रश्न नाही, तो लोकसभेतही सोडवता येतो. काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केलेच ना. एका झटक्यात तीन राज्य केंद्रशासित केली, मग कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न शेकापचे सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील चर्चेत बोलताना ते म्हणाले, हा प्रश्न लोकसभेचा आहे आणि लोकसभा निर्णय घेऊ शकते. पंतप्रधान ज्या गतीने निर्णय घेतात, ते पाहता हा प्रश्नही तातडीने सोडवता येऊ शकतो. अधिवेशन संपताच विधानसभा आणि विधानपरिषदेचे सर्व सदस्य मिळून संसदेत जाऊ. तेथे आंदोलन करू. सीमावासीयांची चेष्टा करणे सोडा. खोटे आश्वासन देऊ नका. महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकेकाळी नऊ आमदार होते, आता एकही नाही. त्यामुळे ही समिती कमजोर झाली आहे. परिणामी तिथला मराठी माणूस कमजोर झाला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.