नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी नागपुरातील सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. मात्र, यातील काही संस्थांना या परीक्षांचा अनुभव नसतानाही त्यांना काम देण्यात आल्याचा आक्षेप डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडेंट्स फेडरेशनने घेतला आहे. ‘बार्टी’कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बार्टी’च्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पिरॅमिड टयुटोरिअल, मोशन एज्युकेशन प्रा. लि., गाईडलाईन एज्युकेशन सव्र्हिसेस, विलास अकॅडेमी ऑफ सायन्स, करिअर कॅम्पस आणि ओयासिस शिक्षण संस्था अशा सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. १०० विद्यार्थ्यांना ‘जेईई’चे आणि आणखी १०० विद्यार्थ्यांना ‘नीट’चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा हजारांचे विद्यावेतनही दिले जाणार आहे.

हेही वाचा >>>मराठा-कुणबी उल्लेख असणाऱ्यांना विदर्भात ओबीसींचा दाखला

ज्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण हवे त्यांना या सहापैकी एका संस्थेकडे प्रशिक्षणासाठी अर्ज करायचा आहे. विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेता येईल. मात्र, या सहापैकी काही संस्थांकडे ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षेच्या प्रशिक्षणाचा कोणताही अनुभव नाही. अशा संस्थांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळणे कठीण आहे. त्यामुळे ‘बार्टी’ने निवड केलेल्या संस्थांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडेंट्स फेडरेशनने आक्षेप घेतला आहे. अशा संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यास त्यांचे प्रचंड नुकसान होऊन मुळ उद्देशाला तडा जाणार आहे. त्यामुळे अशा संस्थांची चौकशी करून त्यांच्याकडून प्रशिक्षण कार्यक्रम काढून घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.

‘बार्टी’ने ‘जेईई’ आणि ‘नीट’च्या प्रशिक्षणासाठी सहा संस्थांची निवड केली असली तरी यात काही अनुभव नसणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे कठीण आहे. याची चौकशी व्हायला हवी. – अतुल खोब्रागडे, युवा ग्रज्युएट फोरम

सहा संस्थांची निवड ही त्यासंदर्भातील निकषांनुसारच करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी संस्था निवडीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्वात उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचीच ते निवड करू शकतात. – सुनील वारे, महासंचालक, बार्टी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee neet coaching work for novice institutes from barti amy
Show comments