वर्धा : एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीने पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांबाबत देशभरातील विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहलेली असते. देशातील आयआयटी प्रवेशासाठी जे ई ई परीक्षा सर्वात महत्वाची असते. या परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी तर दुसरा टप्पा १ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
५ मे रोजी नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी परीक्षा होणार आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा १५ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत. तर पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ११ ते २८ मार्च या कालावधीत होईल. युजीसी नेट ही परीक्षा १० ते २१ जून दरम्यान होत आहे. सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना दिल्या जाणार आहे. या सर्व संगणक आधारित परीक्षांचे निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यात जाहीर होतील. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.