जितेंद्र आव्हाडांनी कारवाईवर उपस्थित केले प्रश्न
गडचिरोली: ट्विटरवरुन वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी २१ जून रोजी पुणे व नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुण्यातून एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेऊन महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरु आहे, असा सवाल केला.
आदित्य चव्हाण व मनोज पिंपळे अशी ताब्यात घेतलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत. चव्हाणला पुण्यातून तर पिंपळेला नागपूर येथून २१ रोजी पहाटे ताब्यात घेतले आहे. आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर पोस्ट करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात ३१ मे २०२३ रोजी दोन ट्विटर हँडलरवर गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने याचा तांत्रिक तपास केला. ट्विटर तसेच एका खासगी मोबाइल कंपनीकडून मागविलेल्या तपशीलावरुन आदित्य चव्हाण व मनोज पिंपळे यांनी हे ट्विटर खाते बनावट नावाने हाताळल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेची दोन पथके पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधात सक्रिय झाले. २१ जून रोजी पहाटे पुण्यातून आदित्य चव्हाण व नागपूर येथून मनोज पिंपळे यांना अटक करण्यात आली.
आव्हाडांचा आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट करुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईबाबत आरोप केला. त्यानुसार, चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता. आई- बहिणीने अडविले असता त्यास चतु:श्र्रुंगी ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी त्याच्या आई- बहिणीशी वाद घातला व नंतर खासगी गाडीत घेऊन गेले. अंगात खाकी वर्दीही नव्हती. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले तर संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चव्हाणच्या आईने हा संपूर्ण घटनाक्रम चतु:श्र्रुंगी ठाण्यातून सांगितल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे.
आरोपींविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्याचा तांत्रिक तपास केल्यावर २० दिवसांनी दोन आरोपी निष्पन्न झाले. नागपूर व पुण्यात त्यांना ताब्यात घेतले असून पथक गडचिरोलीला येत आहे. संपूर्ण कारवाई ही कायदेशीर आहे. – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.