भगवान रामावरून केलेल्या वादग्रस्त वादावर पडदा पडत नाही तोवर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देण्यावरून त्यांनी विधान केलं आहे. ते नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित केलेल्या समता परिषदेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आजही वाईट वाटतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला. न्यायपालिकेतील निर्णय अशी येतात की लगेच त्यातून जातीचा वास येतो.
“न्यायव्यवस्थेकडून हे अपेक्षित नाही. न्यायव्यवस्था निष्पक्ष असली पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण खरंच असं होतं का? आता कुठे तरी बार कॉन्सिलमध्ये बहुजन लोक दिसायला लागलेच. त्यांच्या पिढ्याच शिकल्या नाहीत, मग बारमध्ये कसे जातील? ते बारमध्ये (मदिरा) जायचे. त्या बारमधून निघून या बारमध्ये यायला गेली ना ७० वर्षे निघून”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा >> “राम मांसाहारी होता”, आव्हाडांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले, “चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे आणि कोंबड्या कापणारे…”
राष्ट्रपती मुर्मूंना दारामागे बंद केलंय
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, ज्या रामाच्या मंदिराचे उद्घाटन होत आहे, त्यांनी तर शबरीची उष्टे बोरेही खाल्ली होती. त्या रामाने कधीच आदिवासींना बाजूला केले नव्हते. मात्र मोदी सरकार कुठेही राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना समोर आणत नाही. त्यांना दारामागे बंद केलेय राम मंदिराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवायला हवे होते, असंही आव्हाड म्हणाले.
फक्त एका आदिवासी महिलेला आम्ही राष्ट्रपती केलं, हे देशासमोर मिरवायला मोदींनी त्यांना राष्ट्रपती केले. संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेलाही द्रोपदी मुर्मू यांना टाळले गेले. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेला राष्ट्रपतींना टाळून साधू महात्मांना बोलावण्यात आले, असंही ते म्हणाले.
राम मांसाहारी होता
“राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डीतील मेळाव्यात केले होते. या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता.