नागपूर : महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा आणि महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजना लागू करण्याचा प्रचार जोरात सुरू आहे. या योजनेत रक्कम वाढवून देण्याचे आश्वासनही दोन्ही पक्ष देत आहेत. तसेच या योजनेवरून आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. या निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. काँग्रेसनेही महालक्ष्मी योजनेतून ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी महत्वाचे विधान केले आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात ज्या गॅरंटी दिल्या होत्या, त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ‘लाडली बहन योजना’ सुरू केली. भाजपला मध्य प्रदेशात विजय मिळाला. परंतु मध्य प्रदेशमध्ये या योजनेची रक्कम नियमित दिली जात नाही. आता महाराष्ट्रात भाजपने निवडणुकीच्या तोंडावर ती योजना सुरू करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांचा घणाघात
नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक विषमता आणली आहे. गरीब आणि श्रीमंत यातील दरी वाढली आहे. काही निवडक लोकांकडे अमाप पैसा, संपत्ती आहे तर काही अतिशय गरिबीत जगत आहेत. प्रचंड महागाई वाढवून ठेवली आहे. त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
पुतळा पडणे हाच भ्रष्टाचाराचा पुरावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे महाराष्ट्रात लोकार्पण केले. तो पुतळा काही महिन्यात पडला. महाराजांचा पुतळा उभारण्यात भाजपने किती भ्रष्टाचार केला, हा त्याचा पुरावा आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही पटवारी म्हणाले.
हेही वाचा…गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : नितीन गडकरी
मोदींच्या नव्या भारतात संविधानाची पायमल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन भारत असल्याचे सांगतात. त्यांच्या या भारतात आमदार, खासदारांची खरेदी, विक्री केली जाते. संविधानाची पायमल्ली केली जाते. राज्यपाल केंद्राच्या इशाऱ्यावर वेगवेगळ्या राज्यातील सरकार अस्थिर करतात आणि नवीन सरकार स्थापन व्हावे म्हणून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यासाठी रात्रभर जागतात. महाराष्ट्रातील विद्यमान सरकार बेकायदेशीर सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून हे सरकार आले आहे, असेही ते म्हणाले.