एखाद्या आस्थापनेत नोकरी मिळवायची असेल, तर शैक्षणिक पात्रता हाच महत्त्वाचा निकष असतो. ती आस्थापना किंवा ते खाते सरकारी असेल, तर आरक्षणाचा मुद्दा समोर येतो व जात हा निकष मग महत्त्वाचा ठरतो. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वाच्या मनात हे निकष ठासून बसलेले आहेत. त्याला छेद देण्याचे काम आता बाबा रामदेवांच्या पतंजलीने सुरू केले आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांचे लाडके असलेले हे योगगुरू नागपुरातील मिहानमध्ये योगा फूडपार्क सुरू करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या प्रस्तावित उद्योगाचे दणक्यात भूमिपूजन झाले. वेगवेगळ्या प्रकारची पाचशे उत्पादने तयार करणाऱ्या या उद्योगात नोकरी हवी असेल, तर योग प्रशिक्षण आवश्यक आहे, अशी अटच पतंजलीने जाहीर केली आहे. जो बेरोजगार तरुण रामदेवबाबांचा मुख्य योगशिक्षक प्रशिक्षणाचे शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण करेल तोच या उद्योगात नोकरीसाठी पात्र ठरणार आहे. हे प्रशिक्षण बेरोजगारांना फुकट दिले जाणार नाही. त्यासाठी हजार रुपये प्रत्येकाला मोजावे लागणार आहेत. या उद्योगात शिपाई असो वा अभियंता, तो योग प्रशिक्षित असलाच पाहिजे, असे या उद्योगाने जाहीर केले आहे. तुम्ही योगात निपुण असाल पण व्यसनी असाल, तर तेही या उद्योगाला खपणारे नाही. नोकरी मिळवणारा प्रत्येकजण निव्र्यसनीच असावा, अशीही एक अट आहे. या उद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनाच्या विक्री साखळीत सहभागी होत अप्रत्यक्ष रोजगार मिळवणाऱ्याला सुद्धा या अटीचे पालन करावे लागणार आहे.
मुळात योगाभ्यास करणे यात काहीही वाईट नाही. माणसाने निव्र्यसनी असावे, ही अपेक्षा बाळगण्यातही काही चूक नाही. तरीही नोकरी मिळवायची असेल, तर एका विशिष्ट धर्माचे प्रतीक म्हणून जाणीवपूर्वक समोर करण्यात येत असलेला योग आवश्यकच, हा यामागचा दृष्टिकोन पूर्वग्रहाने ग्रासलेला आहे. विशेष म्हणजे, बाबा हा योग फुकटात शिकवत नाहीत. पतंजलीच्या मिहानमधील उद्योगाची रोजगारक्षमता १२ हजार आहे. हा उद्योगसमूह मात्र २५ हजार बेरोजगारांना येत्या दोन महिन्यात योग शिकवणार आहे. त्यामुळे नोकरी न मिळणाऱ्या १३ हजार बेरोजगारांचे पैसे या उद्योगाच्या खिशात नोकरी न देताही जमा होणार आहेत. या उद्योगाशी संबंधित प्रत्येकाला योग यायलाच हवा, असे जर धोरण राहणार असेल तर या फूडपार्कसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा तो शिकावा लागणार आहे. अलीकडच्या काही वर्षांत हा शेतकरी आर्थिकदृष्टय़ा पार पिचून गेला आहे. अशात त्याला पैसे मोजून आधी योग शिकायला लावणे कितपत योग्य आहे? मुळात सरकारने या बाबाला मिहानमध्ये स्वस्तात जमीन दिली, ती या भागातील बेरोजगारांचे लोंढे कमी व्हावेत व शेती उद्योगाला चालना मिळावी यासाठी. पतंजलीला कमी दरात जमीन देण्यावरून मोठे वादळही उठले, तरीही एक उद्योग येतो आहे, हे सकारात्मक भावना ठेवून अनेकजण याकडे आशेने बघत होते. आता त्यांच्यावर या नाहक अटी लादणे अन्यायकारक आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत रामदेवबाबांच्या प्रत्येक योग शिबिरातून भाजपचा प्रचार केला गेला. निवडणुकीच्या काळात ही गावे व शहरांत रोज होणारी शिबिरे राजकारणाचा अड्डाच बनली होती. आता या उद्योगाच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून भाजप मतदार वाढवा अभियान तर राबवले जात नाही ना, अशी शंका घेण्यास बरीच जागा आहे. सत्ताकारण आणि व्यापार यांची अनोखी सांगड घालण्याचा हा प्रकार योग्य नाही. स्वत:च्या उद्योगात नोकरीसाठी कोणती अट ठेवायची त्याचा पूर्ण अधिकार पतंजलीला आहे. त्यात इतरांनी लुडबूड करण्याचे काही कारण नाही, हेही खरेच! मात्र, या व्यापाराच्या माध्यमातून एखाद्या पक्षाचे राजकीय बळ वाढवण्याचे प्रकार होत असतील आणि तो उद्योग सरकारच्या सवलती घेऊन असले थेर करत असेल तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. उद्या भाजपची सत्ता गेली आणि दुसरा पक्ष सत्तेत आला तर हा उद्योग हीच अट कायम ठेवेल का? सत्तेत येणारा दुसरा पक्ष त्याला तसे करू देईल का? विदर्भात उद्योगांना चालना मिळावी म्हणून मिहानची स्थापना करण्यात आली. तेथे उद्योग उभारणाऱ्याला अनेक सवलती दिल्या जातात. या सवलती कोणता एक पक्ष देत नाही, तर सरकार नावाची यंत्रणा देते. या यंत्रणेसमोर सर्व नागरिक समान आहे, तसेच या यंत्रणेला राजकारणाशी काही घेणेदेणे नसते. एकीकडे या सवलतींवर डोळा ठेवायचा व दुसरीकडे विशिष्ट धर्माच्या प्रतीकांना प्राधान्य देत राजकीय लाभाचे खेळ करायचे हा दुटप्पीपणा झाला. तो फार काळ खपणारा नाही, हे या उद्योगाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. रामदेवबाबा आक्रमकपणे व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी तो व्यापारी दृष्टिकोन ठेवूनच करावा. त्यासाठी अशी सक्तीची भूमिका कशासाठी?, हा यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. येथे उद्योगाची पायाभरणी करताना पतंजलीने स्वदेशीचा नारा दिला. हा उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढेल, अशी स्तुतीसुमने अनेक वक्तयांनी यावेळी उधळली. प्रत्यक्षात पतंजलीची उत्पादने डाबर, बैद्यनाथ, विको या पूर्णपणे स्वदेशी असलेल्या कंपन्यांशीच स्पर्धा करीत असल्याचे बाजारातील चित्र आहे. या साऱ्या उत्पादनांचा धागा आयुर्वेद हाच आहे. स्वदेशीच स्वदेशीच्या मुळावर उठण्याचा हा प्रकार उघड दिसत असताना वक्ते पतंजलीची तरफदारी करीत होते, यामागील कारण स्पष्ट आहे. बाबांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या मदतीची परतफेड या वक्तयांना करायची आहे. उद्योग नसल्यामुळे विदर्भात बेरोजगारांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यात सर्वच जातीधर्माचे तरुण आहेत. यापैकी कुणाला योग करायचा नाही म्हणून त्याला नोकरी नाकारणे हे योग्य नाही, हे या उद्योगाने तसेच त्याची भलामण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com