अकोला : कृषी तंत्रज्ञानात्मक शिफारशींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठक ७ ते ९ जूनदरम्यान घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे २० पीक वाण, आठ यंत्रे व अवजारे आणि २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानांना मंजुरी देण्यात आली आहे. हे संशोधन याच हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीचा रविवारी समारोप झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारोपीय कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्यासह चारही कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक, कार्यकारी परिषद सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा…महाराष्ट्र कुस्तीगीर संघावर सुख दुःखाचे सावट! एक पैलवान मंत्री तर दुसरा…

संशोधनाद्वारेच राज्यातील कृषी क्षेत्र आज सक्षम झाल्याचे डॉ. प्रशांत पाटील म्हणाले. भविष्यातील कृषी संशोधनाची दिशा शेतकरीभिमूख असण्याची गरज डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केली. कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न समजून त्यावर काळानुरूप उपाययोजना सुचवणे आवश्यक आहे, असे मत डॉ. संजय भावे यांनी व्यक्त केले.

विविध तांत्रिक सत्रांमध्ये गटनिहाय झालेल्या संशोधनात्मक सादरीकरणाचे निष्कर्ष व गुणवत्ता तसेच सखोल विचार मंथनातून पिकांचे सुधारित नवीन आशादायक वाण, सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उपयुक्त कृषी तंत्रज्ञानविषयक शिफारशींना अंतिम मान्यता देण्यात आली. मंजूर पीक वाण, शिफारस तथा इतर उपलब्धींचे डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. व्ही.एल. आमोलिक, डॉ. ए.एन. पसलावार, डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. एस.व्ही. दिवेकर, डॉ. अनिल कोल्हे, डॉ. शैलेश ठाकरे, डॉ. निशांत शेंडे, डॉ. राम घोराडे, डॉ. नितीन गुप्ता, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. ताराचंद राठोड आदींनी सादरीकरण केले.

हेही वाचा…गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी मतदार भाजपपासून दुरावले!

समारोपीय सत्रात चारही कृषी विद्यापीठांमधून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी, तर आभार संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी मानले.

हेही वाचा…चंद्रपूर : महापालिका राजकारणात सक्रिय नेत्यांच्या पराभवाचा इतिहास

पुढील बैठक परभणीला

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची पुढील वर्षी ५३ वी बैठक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात परभणी येथे होणार आहे. अकोला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी परभणीचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांना नारळ देत संयुक्तरित्या हस्तांतरित केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joint agricultural research meeting approves 20 new crop varieties and 250 technologies for maharashtra s agricultural universities ppd 88 psg
Show comments