लोकसत्ता टीम
नागपूर : जैवविविधता संवर्धनात अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा गिधाड पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गिधाडाच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्रांसाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
गिधाडांच्या संवर्धन व पुनर्स्थापनेकरिता पेंच व्याघ्रप्रकल्पातील पूर्व पेंच पिपरिया वनक्षेत्रातील बोदलझिरा बिटातील कक्ष क्र. ५२६ मध्ये सॅडलडॅम येथे दहा गिधाडे आणण्यात आली. हरियाणा येथील पिंजोरमधील गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्रातून लांब चोचीची (भारतीय गिधाड) ही गिधाडे होती. नुकतेच त्यांना जीपीएस टॅग लावून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आणखी वाचा-“नवनीत राणांचा नंबर लागला, आता माझा….…”, आमदार रवी राणा असे का म्हणाले?
पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली. २१ जानेवारी २०२४ ला पिंजोर येथून आणलेली गिधाडे त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी पेंच व्याघ्रप्रकल्पात त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खुल्या ‘एव्हीअरी’ मध्ये ठेवण्यात आली. गेल्या सात महिन्यापासून ती नैसर्गिक अधिवासातील गिधाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होती. त्यांच्यातला हा संवाद पक्का होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पेंच व्याघ्रप्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला. ही गिधाडे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत जातील तेव्हा त्यांचे ठिकाण व माहिती मिळवणे सोपे जावे म्हणून या गिधाडांना जीपीएस टॅग लावण्यात आले.
आणखी वाचा-गोंदिया: अवैध फलकामुळे अपघात, शिक्षिकेचा जागीच मृत्यू
दहा ऑगस्टला दूपारी १२ वाजताच्या सुमारास गिधाडांच्या खुल्या ‘एव्हीअरी’च्या बाहेर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेले चितळ ठेवण्यात आले. नैसर्गिक अधिवासातील गिधाड या मृत चितळाला खायला आल्यानंतर ‘एव्हीअरी’तील गिधाडांना मुक्त करण्याचे ठरवण्यात आले. मात्र, हा प्रयोग करण्याआधी पाऊस दाखल झाला आणि अडथळा निर्माण झाला. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर ‘एव्हीअरी’चे दार उघडण्यात आले. स्थानीक गिधाडांनी मृत चितळ खायला येण्यास सुरुवात केली, तेव्हाच आतील गिधाड सुध्दा स्थानीक गिधाडांसोबत ‘एव्हीअरी’च्या बाहेर येवून मृत चितळ खावू लागले. काही वेळाने बाहेरच्या गिधाडांसोबतच ही गिधाडे उडाली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पेंच व्याघ्र प्रकल्पातील गिधाडांच्या अधिवासाबाबत व त्यांचा संवर्धनाबाबत अधिक माहिती या प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणार आहे. यावेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, संचालक किशोर रिठे, पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, पुर्व पेंच पिपरियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, पशूवैद्यक डॉ. निखिल बनगर, डॉ. काझविन उमरिगर, जीवतज्ञ मनन सिंग महादेव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
© The Indian Express (P) Ltd