गोंदियाः जिल्ह्यात धान व दुसऱ्या क्रमांकावर गहू हीच पारंपरिक पीक आतापर्यंत चालत आली असून, शेतकरी अन्य पिकांकडे वळताना फारसा दिसत नव्हता. मात्र, आता धान शेती धोक्याची झाली असल्याने शेतकरी त्याला पर्याय म्हणून अन्य पिकांकडे आकर्षित होत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गव्हाला बगल देत यंदा ज्वारी हाती घेतल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी फक्त धान शेतीलाच प्राधान्य देतो. आजही बहुतांश शेतकरी धान लागवडच करीत असून, दोन्ही हंगामात त्यांनी धान लावायचे हे ठरवूनच ठेवले आहे. मात्र, धान शेती नेहमीच धोक्याची राहिली
असल्याचा इतिहास चालत आला आहे. हेच कारण आहे की, आजपर्यंत येथील शेतकरी समृद्ध झाला नाही. निसर्ग नेहमीच शेतकऱ्यांना झोडपून काढत आला आहे. यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून नेला आहे. वारंवारचा हा धोका बघता शेतकऱ्यांनी अन्य नगदी पिकांकडेही वळावे यासाठी कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. याचा काही प्रमाणात फायदा आता दिसून येत आहे.

हेही वाचा – “मी मुख्यमंत्र्यांविरोधात ठाण्यातून लढण्यास तयार”, आदित्य ठाकरेंचे आव्हान, म्हणाले…

कारण, जिल्ह्यातला शेतकरी आता धानासोबतच अन्य पिकांकडे वळताना दिसत आहे. या रब्बी हंगामातच त्याची प्रचिती येत असून, फक्त धान आणि गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा गव्हाला बगल दिल्याचे दिसत आहे. यंदा जिल्ह्यात २२३२.०७ हेक्टर गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यातील ५३३.१० हेक्टरमध्येच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणी केली आहे, तर ज्वारीचे ४३५.६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, शेतकऱ्यांनी चक्क ५३५.८९ हेक्टरमध्ये ज्वारीची प्रत्यक्ष पेरणी केली आहे. यावरून यंदा जिल्ह्यात ज्वारीचाच बोलबाला दिसून येत आहे.

यामुळे ज्वारीला मागणी

ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, फॅच आणि अँटी ऑक्सीडंट तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे ज्वारी खाल्ल्याने हाडांना मजबुती मिळते, ज्वारी लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते, मधुमेहात ज्वारी फायदेशीर ठरते. तसेच त्वचेच्या कर्करोगापासून ज्वारीमुळे बचाव होतो. हेच कारण आहे की, ज्वारीला प्रचंड मागणी आहे.

हेही वाचा – द्राक्षाला एकरी एक लाख मदत द्या, विधानभवनाच्या पायरीवर आमदार रोहित पवार आणि आमदार सुमन पाटील यांचे धरणे आंदोलन

यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात सर्वाधिक लागवड करण्यात आल्याचे दिसते. गोंदिया तालुक्यात ज्वारीचे ५९.४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतानाच १३० हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर गोरेगाव तालुक्यात ४९.४० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, १२७.९० हेक्टरमध्ये, अर्जुनी- मोरगाव तालुक्यात ५५.२० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, तेथे ११७ हेक्टरमध्ये तर देवरी तालुक्यात ६७.६४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, ९८ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. तर आमगाव तालुक्यात ४३.०४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून लागवड फक्त ७.१० हेक्टरमध्ये तसेच सालेकसा तालुक्यात ४४.६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून लागवड फक्त १९.१९ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. फक्त दोन तालुक्यात लागवड क्षेत्र कमी असून उर्वरित जिल्ह्यात ज्वारीचाच बोलबाला दिसून येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jowar is dominant in gondia district this year sar 75 ssb