बुलढाणा : इंडिया आघाडी म्हणजे अहंकारी नेत्यांची, भ्रष्टाचारी नेत्यांचा बचाव व संरक्षण देणारी आघाडी असल्याची जहाल टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा नुसताच चौफेर विकास केला नसून देशाच्या राजकारणाची परिभाषा, दिशाच बदलल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज जिल्ह्याच्या सीमेवरील वरवंट बकाल येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, धृपदराव सावळे, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, रिपाइं आठवले चे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नड्डा यांनी इंडिया आघाडी, तत्कालीन युपीए सरकार यांच्यावर टीकेची झोड उठवत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचा पाढाच वाचला.
हेही वाचा – तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
इंडिया आघाडी म्हणजे अहंकारी नेत्यांची व भ्रष्टाचारी नेत्यांची आघाडी आहे. आघाडीतील अनेक नेत्यांवर कार्यवाही सुरू असून अरविंद केजरीवाल, मनोज सिशोदिया सारखे नेते तुरुंगात आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचार, घोटाळे यांना उत आला होता. ‘परिवारवाद भ्रष्टाचार करा, मलाई खा, मौज करा आणि जनतेला विसरून जा’, अशी काँग्रेसची कार्यपद्धती राहिली. याउलट नरेंद्र मोदींनी देशाचा चौफेर विकास करीत देशाला जगात मानाचे स्थान मिळवून दिले, पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली आहे. त्यांनी देशाच्या राजकारणाची व्याख्या, दिशा बदलून टाकली आहे. राजकारणाची वाटचाल बदलत राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविल्याचे आग्रही प्रतिपादन नड्डा यांनी केले. त्यांनी गावखेडी, महिला, गरीब, युवक,दलित- शोषित, शेतकरी, यांना राजकारण व विकासाचा केंद्रबिंदू केले आहे.
हेही वाचा – हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?
नरेंद्र मोदींसाठी निवडणूक व मतदान म्हणजे मतदारप्रति जबाबदारी, विकासाची गॅरंटी आहे. २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजप व मित्र पक्षांना पाठबळ देत स्थिर सरकार आणले. यामुळे ३७० कलम, अयोध्या राममंदिर, सुशासन, सीएए, ट्रिपल तलाकसारखे धाडसी निर्णय घेता आले. यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये युतीला पाठबळ देत तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन नड्डा यांनी केले.