महसूल खात्यात जिल्हापातळीवर बदल्या करताना किती घोळ घातला जातो, याचा प्रत्यय जिल्हाधिकारी कार्यालयातील नुकत्याच झालेल्या बदल्यांवरून दिसून येतो. जागा रिक्त नसताना तेथे दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवून संबंधितांचा मनस्ताप वाढविण्याचा पराक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे. झालेली चूक लक्षात येताच नंतर सारवासारवही करण्यात आली आहे.
अलीकडच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाने ७३ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. नागपूर ग्रामीण तहसीलमधील काही कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. यापैकी एका कर्मचाऱ्याची बदली मौदा येथे करण्यात आली होती. संबंधित कर्मचारी तेथे रुजू होण्यासाठी गेला असता तेथे त्याला पदच रिक्त नसल्याचे सांगण्यात आले. तसे पत्रही तेथील तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दिले. एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करताना तेथे पद रिक्त आहे किंवा नाही याची खातरजमा करून घेणे आस्थापना विभागाचे काम असते. प्रत्यक्षात तसे न करता थेट बदलीचे आदेश काढण्यात आले.
नियमानुसार दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. बदल्या करताना कर्मचाऱ्यांना वेगवेगळे विभाग दिले जातात. प्रत्येक विभागाचे काम करण्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना असावा हा या मागचा उद्देश आहे. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात हे नियम कधी पाळलेच जात नाही. कागदोपत्री बदली दाखवून सेवासलग्नाचा आधार घेत त्याला थाबंवून ठेवले जाते. यासाठी कधी कर्मचाऱ्याचा अनुभव लक्षात घेतला जातो तर कधी तो सांभाळत असलेला ‘टेबल’ महत्त्वाचा ठरतो. त्या कामासाठी अधिकाऱ्यांना दुसरा कर्मचारी नको असतो. ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना नेमकी हीच काळजी घेण्यात आल्याने असंतोष वाढला आहे.
आस्थापना विभाग, स्वागत कक्ष, जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी असलेले अव्वल कारकून संवर्गातील कर्मचारी, रेकॉर्ड शाखा आदी विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ‘हात’न लावण्याचे धोरणही प्रशासनावर शंका निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहेत.
दरम्यान, महसूल शाखेत नव्यानेच नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या शाखा देण्यात आल्या आहेत. त्यांना कामकाज समजून घेण्यासच वेळ लागत असल्याने कामाच्या गतीवरही परिणाम झाला आहे. सरकारी कामकाजाचा वाढता बोझा, मंत्रालयाशी होणारा नियमित संपर्क, त्यांना द्यावी लागणारी माहिती यासाठी अनुभवी कर्मचाऱ्याची गरज भासते. बदल्यांचे नियोजन करतानाही ही बाब लक्षात घेणे अभिप्रेत असताना नेमके त्याच्याकडेच दुर्लक्ष झाले आहे. याविरोधात आता तहसीलदारही खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.
नागपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष ईश्वर बुधे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाच्या बदली धोरणाचा निषेध केला. बदल्यांच्या बाबत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भेटून निवेदनही देण्यात आले होते. परंतु त्यावर काहीही कार्यवाही झाले नाही, असे त्यांनी सांगितले.