नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने राज्य शासनाच्या चार महत्त्वाच्या विभागांसाठी जम्बो भरतीची जाहिरात काढली आहे. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागामधील विविध पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना आता एमपीएससच्या विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये न मिळण्यास राज्य शासन जबाबदार; राजू शेट्टी यांचा आरोप
या पदांमध्ये गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ६१५ पदांसाठी जाहिरात निघाली आहे. तर आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा संचालक गट-अ पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. औषधी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकाच्या ४२ पदांची जाहिरात आली आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला शिक्षण सेवा गट -अ ची १३ पदे, सहायोगी प्राध्यापक ३५ पदे, सहाय्यक प्राध्यापक ९४ पदे, विविध विषयांचे विभागप्रमुख ०४ पदे, अधिव्याख्याता ०४ पदे, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य १७ पदे, प्राचार्य हॉटेल मॅनेजमेंट ०२ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वेगवेगळी असून विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.