अकोला : २१ जूनला सूर्य अधिकाधिक उत्तरेस असून त्याचे दक्षिणेकडे जाणे अर्थात उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. २१ जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो व रात्र सर्वात लहान असते. मंगळवारी दिवस सव्वातेरा, तर रात्र पावणेअकरा तासांची असेल, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली.
हेही वाचा >> “मी जर चिंता करत बसलो तर…”, उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना संदेश!
दररोज पूर्वेकडे उगवणारा सूर्य काहीसा दक्षिणोत्तर सरकल्याचा अनुभव येत आहे, याचे कारण पृथ्वीच्या अक्षाने तिच्या परिभ्रमण प्रतलाशी केलेला २३.५ अंशाचा कोन हे आहे. त्यामुळे सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्तापर्यंत फिरत असल्याचा भास होत असून यालाच उत्तरायण/दक्षिणायन म्हणतात. २१ जूनपासून सूर्य दक्षिणेकडे सरकून २२ सप्टेंबर या शरद संपातदिनी पुन्हा विषुववृत्तावर व त्यानंतर २२ डिसेंबरला अयनदिनी सूर्य मकरवृत्तावर आल्याने हा दिवस सर्वात लहान तर रात्र सर्वात मोठी असते.
हेही वाचा >> विश्लेषण : कोळशाचा सर्वात मोठा निर्यातदार असूनही ऑस्ट्रेलियात विजेचं महासंकट; जाणून घ्या नेमकी कारणे
उत्तरायणात सूर्य उत्तर गोलार्धात व दक्षिणायनात सूर्य दक्षिण गोलार्धात झुकलेला दिसतो. २१ जून या सर्वात मोठ्या दिवशी आपल्या भागात दिवस सव्वातेरा तासांपेक्षा अधिक व रात्र मात्र पावणेअकरा तासांची असते. याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मानवी शरीर व मनाचे संबंध अधिक दृढ करून निसर्गाच्या संवर्धनासाठी एकत्र यावे, असे आवाहन विश्वभारती विज्ञान केंद्रच्यावतीने करण्यात आले आहे.