भंडारा : आरओ प्लान्टच्या कामाचे बिल काढण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारताना भंडारा जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सुहास करेंजकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सुहास करेंजकर हा भंडारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता आहे. आरओ प्लान्टच्या कामाचे बिल काढण्यासाठी करेंजकर यांनी आठ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप आहे. ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भंडारा जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाकडून आरओ प्लान्ट बसविण्यात आले होते.
त्या कामाचे ९ लाख ८० हजार रुपयांचे बिल थकले होते. काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराने हे बिल प्रशासनाकडे सादर केले. त्यानंतर करेंजकर यांनी कंत्राटदाराला बिलाच्या एकूण रक्कमेपैकी आठ टक्के रक्कम मागितल्याचा आरोप आहे. सुरुवातीला करेंजकर यांनी मागितलेली रक्कम मोठी होती. परंतु तडजोडीनंतर ४० हजार रुपयांत सौदा ठरला. कनिष्ठ अभियंता असलेल्या सुहास करेंजकर यांना पकडल्यानंतर आता त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. करेंजकर यांच्याकडे चार ते पाच बंगले असल्याची चर्चा आता भंडारा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे करेंजकर दरवर्षी नवीन कारही खरेदी करतात. कारचे कोणतेही मॉडेल त्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरलेले नाही, असं जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एसीबीच्या पथकाला सांगितले. त्यामुळं करेंजकर त्यांच्या तथाकथित सर्व बंगल्यांची झाडाझडती आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
करेंजकर यांना महागड्या कारचाही शौक आहे. त्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत खरेदी केलेल्या सर्व वाहनांचा तपशिलही आता बाहेर काढला जाणार आहे. बिल काढण्यासाठी करेंजकर यांनी मागितलेली रक्कम ते स्वतःच खिशात टाकणार होते की त्यात अन्य कोणाचा वाटा होता, याचाही तपास केला जाणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील या गैरप्रकाराची तक्रार एका नेत्याच्या साळ्याने केल्याचे बोलले जात असून त्यामुळे आता राजकीय व प्रशासनात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.