अमरावती : अमरावती : सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा सूर्याशी प्रतियुतीत येत असून येत्या ७ डिसेंबरला तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ पाहायला मिळणार आहे, अशी माहिती येथील खगोल अभ्यासकांनी दिली आहे.गुरू हा ग्रह ७ डिसेंबरला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ म्हणतात. या दिवशी सूर्य व गुरू आमने-सामने राहतील. प्रतियुतीच्या काळात गुरूचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासकांना गुरूचे निरीक्षण करण्याची ही संधी आहे. लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण १३ महिन्यांचा असतो. यापूर्वी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली होती.
पृथ्वीपासून गुरूचे अंतर ९३ कोटी किमी व व्यास १,४२,८०० किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यास ११.८६ वर्षे लागतात.
गुरू हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्याने पाहता येणार आहे. ग्रेट रेड स्पॉट, युरोपा, गॅनिमीड, आयोव कॅलेस्टो हे गुरूचे चार चंद्र मात्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाही.
हेही वाचा…देवेंद्र लहानपणापासून खोडकर पण…मोठी बहीण स्वाती फडणवीस साठे यांचा आठवणींना उजाळा
यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. गुरूला एकूण ७९ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता गुरूवरचा पट्टा व चार चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवविरहित यान ‘गॅलिलिओ’ गुरूवर पोहोचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.
पृथ्वीपेक्षा गुरू हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे गुरूचे खास वैशिष्ट्य, ‘ग्रेट रेड स्पॉट’ या नावाने हा ठिपका ओळखला जातो. ४० हजार किमी लांब १४ हजार किमी रुंदीचा हा अवाढव्य ठिपका आहे. या ठिपक्याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर घोंघावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात असल्याचे गिरूळकर यांनी सांगितले.
हेही वाचा…वर्धा : ‘ब्रेकी थेरेपी’ काय आहे? असह्य वेदना आणि जटील व्याधी…
गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी गुरू हा ग्रह सूर्याशी प्रतियुतीत आला होता. सध्या गुरू ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असून, येत्या काही दिवसांपर्यंत तो असाच राहणार आहे. हा ग्रह शनिवारी रात्री आकाशात आपले लक्ष केंद्रित करणार आहे.