नागपूर : १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निर्णय सुनावण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार होती आणि यामुळे मोठा धक्का बसला होता असा गौप्यस्फोट या प्रकरणाचा निर्णय देणारे तत्कालीन टाडा न्यायालयाचे न्या.गोविंद सानप यांनी केला. गळ्यावर बदलीची टांगती तलवार असताना निर्णय कसा देणार अशी तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केल्यावर त्यांची बदली काही काळापुरती स्थगित झाली आणि न्या.सानप यांनी खटल्याचा निर्णय दिला.
नेमके काय म्हणाले?
विदर्भ लेडी लॉयर असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सभागृहात न्या.गोविंद सानप यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या.सानप यांनी मुंबई बॉम्बस्फोटसह २६/११ हल्ल्याच्या खटल्यातील अनेक पैलू उलगडले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे उपस्थित होते. मंचावर विदर्भ लेडी लॉयर असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.उमा भट्टड, सचिव ॲड.नीरजा चौबे यांची उपस्थिती होती. २०११ साली न्या.सानप यांनी नेमणूक विशेष टा़डा न्यायालयात झाली. टाडा कायद्याच्या अंतर्गत मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याची सुनावणी त्यांच्या न्यायालयात झाली. २०१७ साली त्यांनी खटला पूर्ण करत निर्णय सुनावला. मात्र हा निर्णय देण्यापूर्वी त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार असल्याचे न्या.सानप यांना कळले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. याबाबत त्यांनी तत्कालीन वरिष्ठ न्यायमूर्तींना माहिती दिली. वरिष्ठ न्यायमूर्तींनी यात दखल देत त्यांच्या बदलीचा आदेश थांबविला आणि त्यांना बॉम्बस्फोट प्रकरणाचा निर्णय देता आला, असे न्या.सानप यांनी सांगितले.
खटल्यादरम्यान फार दबाब होता तसेच अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागत होते. आपली चिंता मुलांकडे व्यक्त केली. प्रकरणातून हात मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे मुलांनां सांगितले, मात्र मुलांनी खडसावले आणि तुम्हाला इतिहास घडविण्याची तसेच बॉम्बस्फोटातील पिडीतांना न्याय देण्याची संधी असताना माघार घेणे योग्य नाही, असे सांगितले. यानंतर मजबूत मनाने सर्व अडथळे, आव्हानांना सामोरे जात अखेर त्यांनी निर्णय दिला, अशी आठवण न्या.सानप यांनी सांगितली.
६० लाखाच्या घडीचा किस्सा
खटल्यातील आरोपींचे अनेक रंजक किस्से न्या.सानप यांनी सांगितले. एका दिवशी एक आरोपी माझ्याकडे आला आणि म्हणाला की माझ्या बायकोने वाढदिवसानिमित्त घड्याळ दिली आहे, मात्र ती बाळगण्यासाठी कारागृह प्रशासन त्रास देत आहे. त्यामुळे तुम्ही ही घडी बाळगण्याबाबत प्रशासनाला आदेश द्या, अशी विनंती आरोपीने केली. साधे घड्याळ असेल म्हणून प्रशासनाला आदेश देण्याचा विचार केला परंतु जेव्हा घड्याळाची किंमत कळली तर डोळे पांढरे झाले. आरोपीकडील ते घड्याळ तब्बल ६० लाख रुपयांचे होते, असे न्या.सानप यांनी सांगितले. तळोजा कारागृहात असलेल्या आरोपींकडे ब्राडेंड कपडे, जोडे असल्याचेही कळले. याबाबत चौकशीचे आदेश दिले, असेही त्यांनी सांगितले.