नागपूर : सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजमोहन लोया यांचा मृत्यू  हृदयविकाराने नव्हे तर त्यांची रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटॉप  विष देऊन हत्या करण्यात आल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. अशाच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर  या नवीन याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय विचार करीत होते. अखेर शेवटी गुरुवारी न्या. रवि देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांनी या प्रकरणावर नियमित सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. २३ जानेवारीला पुढील सुनावणी होईल.

न्या. लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी रविभवनात संशयास्पद मृत्यू झाला होता. तो हृदयविकाराने झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते, परंतु त्यांचा मृत्यू ‘रेडियोअ‍ॅक्टिव्ह आयसोटॉप’ हे विष दिल्याने झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्या. लोया प्रकरणाशी संबंधित दस्ताऐवज सुरक्षित कोठडीत ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. त्यावर न्यायालयाने याचिकेत काही त्रुटी असून त्या याचिकेत सुधारणा करून दूर करण्याचे आदेश दिले होते. पण, अशाच आशयाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून या याचिकेवर सुनावणी घेण्यात येऊ नये, असे मत सरकारी पक्षाकडून नोंदवण्यात आले. पण, येथील याचिकाकर्ते वेगळे असून त्यांना सुनावणी हवी असल्याने न्यायालयाने सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली.

Story img Loader