अनिल कांबळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : चोरी, घरफोडी, लुटमार आणि दरोडय़ासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक बालगुन्हेगार महाराष्ट्रात असून दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.

 देशात १० हजार १० गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असून त्यांनी चोरी, घरफोडी, दरोडा, लुटमार आणि खंडणीसारखे गंभीर  गुन्हे घडवून आणले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक १४२६ अल्पवयीन गुन्हेगार  आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू  असून ९५२ गुन्हेगारांचा समावेश आहे.  तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा (८८४), राजस्थान (८५७) आणि मध्यप्रदेश (७७७) आहे. अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये बिहार-उत्तरप्रदेश सारख्या राज्याला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. देशात ६ हजार ४९५ अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश चोरीच्या गुन्ह्यात तर घरफोडीच्या गुन्ह्यात २ हजार ३० बालगुन्हेगारांचा समावेश आहे. अनेक मोठय़ा गुन्हेगारांच्या टोळीत अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येतो.   अशा गुन्हेगारीतून अल्पवयीन गुन्हेगार बाहेर पडणे कठिण असते.

हेही वाचा >>>लेकीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास वीस वर्षांचा कारावास!

मुंबई-पुण्यात सर्वाधिक बालगुन्हेगार

 सर्वाधिक विधिसंघर्षग्रस्त बालक मुंबई आणि पुण्यात आहेत. बाल गुन्हेगारांमध्ये नागपूर तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत सर्वाधिक ३६३ बालगुन्हेगारांची नोंद करण्यात आली तर पुण्यात २७८ आणि नागपुरात २१० बालगुन्हेगारांची नोंद करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर, नाशिक जिल्ह्यात बालगुन्हेगारी कमी असल्याचे आढळून आले.

पोलिसांची उदासीन भूमिका

एखाद्या गुन्ह्यात १४ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असल्यास पोलीस त्यांची बालगुन्हेगार म्हणून नोंद करतात. मात्र, त्यांना बालगुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत नाहीत. चोरी-घरफोडी सारख्या गुन्ह्यात अल्पवयीन आरोपींबाबत पोलिसांची कायमच नकारात्मक भूमिका असते. त्यामुळे महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juvenile criminals are the most involved in burglaries amy