नागपूर : ज्योती आमगे! जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद आहे. तर जगातील सर्वाधिक उंचीची महिला म्हणून रुमेसा गेल्गीला हिच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे निमित्त दोघींचीही गिनीज वर्ल्ड रेकॉडचे आयकॉन म्हणून निवड करण्यात आली. यानिमित्ताने दाेघींचीही पहिल्यांदाच लंडनच्या सेवॉय हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी दोघींनीही एकत्र चहा पीत काही वेळ सोबत घालवला. त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण ठरला.
ज्योती आमगे ही महाराष्ट्राच्या उपराजधानीतील म्हणजेच नागपूरची, तर रुमेसा गेल्गी ही तुर्की येथील रहिवासी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वर्धापनदिनानिमित्त त्या लंडनमध्ये भेटल्या. एवढेच नाही तर दोघींनीही एकत्र चहा पीत अनेक गोष्टी एकमेकींसोबत सामाईक केल्या. हा पूर्णपणे ‘गर्ल्स डे आऊट’ होता. चहा पीत आणि सोबतीला पेस्ट्री खात दोघींनीही स्वत:ची काळजी, फॅशन, आदींवर चर्चा केली. त्यांची ही बैठक म्हणजे हास्य, कथा आणि प्रेरणा यांचे मिश्रण होती. त्या कधी एकमेकींच्या जवळ आल्या हे दोघींनाही कळले नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या क्षणाची ‘एक गौरवशाली मुलींचा दिवस’ अशा शब्दात नोंद केली.
हेही वाचा – अपघातानंतर काढला ट्रॅव्हल्सचा परवाना; जखमींना सोडून ट्रॅव्हल्स मालक…
रुमेसाची उंची २१५.१६ सेंटीमीटर म्हणजेच सात फूट ०.७ इंच असून तिला जगातील सर्वात उंच महिलेचा मान मिळाला. तर ज्योतीची उंची ही केवळ ६२.८ सेंटीमीटर (दोन फूट ०.७ इंच) आहे. ती जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून ओळखली जाते. या दोघींच्याही उंचीत १५२.३६ सेंटीमीटर म्हणजेच पाच फुटाचा फरक आहे. यावेळी रुमेसाने ज्योतीची प्रचंड प्रशंसा केली. ज्योतीसोबतची तिची पहिली भेट म्हणजे संस्मरणीय क्षण असल्याचे ती म्हणाली. ज्योती ही एक सुंदर स्त्री असून गेल्या अनेक दिवसांपासून मी तिच्या भेटीची प्रतिक्षा करत होते आणि अखेर ती प्रतिक्षा संपली, असे रुमेसा म्हणाली. तर ज्योतीनेही रुमेसाला भेटून खूप आनंद झाल्याचे सांगितले. माझ्यापेक्षा उंच लोकांना वर पाहण्याची मला सवय आहे, पण या कार्यक्रमात जेव्हा मी वर पाहिले तेव्हा माझ्यासमोर जगातील सर्वात उंच महिला होती.
ज्योती आमगे जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद आहे. तर जगातील सर्वाधिक उंचीची महिला म्हणून रुमेसा गेल्गीला हिच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. दाेघींचीही पहिल्यांदाच लंडनच्या सेवॉय हॉटेलमध्ये भेट झाली. pic.twitter.com/kTkyY1Hpgp
— LoksattaLive (@LoksattaLive) November 27, 2024
हेही वाचा – अवकाशात पंच ग्रह दर्शन, खगोल प्रेमींसाठी अनोखी पर्वणी…
माझ्यासाठी खूप मोठे ‘सरप्राईज’ – ज्योती आमगे
लंडनमध्ये जेव्हा मला बोलावण्यात आले तेव्हा आपल्याला आयकॉन करणार किंवा आपण जगातील सर्वाधिक उंचीच्या महिलेला भेटणार हे मला ठाऊक नव्हते. कारण इतके सारे वर्ल्ड रेकॉर्डर आहेत. ज्यावेळी घोषणा झाली तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. यावेळी आमच्या दोघींचेही ‘बायोग्राफी बूक’ प्रसिद्ध करण्यात आले. आमच्या दोघींचेही खूप सारे ‘फोटो शूट’ करण्यात आले. माझ्यासाठी हे खुप मोठे ‘सरप्राईज’ होते, असे ज्योती आमगे लोकसत्ताशी बोलताना म्हणाली.