चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महामंत्री के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी रात्री चंद्रपुरात धडक देत दलित समाजातून येणारे कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या प्रचारात सहभागी न होणाऱ्या काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दलित उमेदवार पडला तर सर्वांचे “डीमोशन” करू असा थेट इशाराच दिला. अनुसूचित जाती साठी राखीव चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसने बौद्ध समाजातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्ता प्रवीण पडवेकर याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

मात्र पडवेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेसचे पदाधिकारी घरी बसून आहेत. आज प्रचार संपायला अवघ्या एक दिवसाचा कालावधी असताना देखील काँग्रेस पदाधिकारी उघडपणे प्रचारात दिसत नाही. दलित उमेदवाराला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले ही बाब काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर असताना निदर्शनास आली.

हेही वाचा…‘या’ जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्रीपदी नाना पटोले म्हणतात,’ फडणवीसांचा रडीचा डाव…’

त्यांनी तातडीने कांग्रेस महामंत्री के.सी.वेणुगोपाल यांना चंद्रपूर येथे पाठविले. शनिवारी रात्री वेणुगोपाल चंद्रपुरातील हॉटेल एन.डी. मध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, शहर अध्यक्ष रामू तिवारी तसेच काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबतच उमेदवार प्रवीण पडवेकर यांची संयुक्त बैठक घेतली.

या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते प्रचारात सहभागी होत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. दलित समाजाचा उमेदवार पडला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. सर्वांचे डीमोशन केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच वेणुगोपाल यांनी दिला. विशेष म्हणजे यावेळी वेणुगोपाल यांनी पडवेकर व त्यांचा मुलगा तुषार याच्यासोबत एकट्याच चर्चा केली. त्यानंतर वेणुगोपाल यांनी जिल्हाध्यक्ष धोटे, खासदार धानोरकर, शहर अध्यक्ष रामू तिवारी यांना कडक शब्दात काही सूचना केल्या.

हेही वाचा…विदर्भातील सर्व सभा तडकाफडकी रद्द करून अमित शहा दिल्लीला

दरम्यान काँग्रेसच्या या बैठकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. केवळ दलित समाजाचा उमेदवार दिल्यामुळे असा प्रकार होत असेल तर पक्ष खपवून घेणार नाही. तेव्हा सर्वांनी प्रचारात उतरावे असेही निर्देश दिले. विशेष म्हणजे काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चंद्रपूर मतदार संघात राजू झोडे तर बल्लारपूर मध्ये डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी केली आहे. या दोन्ही मतदार संघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार गटाचे अनुक्रमे प्रवीण पडवेकर व संतोष सिंह रावत उमेदवार आहेत.

या दोन्ही उमेदवारांना पडण्यासाठी बंडखोरीचे कटकारस्थान रचल्याबद्दल वेणुगोपाल यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे वेणुगोपाल निघून गेल्यानंतर काँग्रेसचे प्रचारात सहभागी न होणारे काही पदाधिकारी व पडवेकर यांच्यात शाब्दिक वाद झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K c venugopal criticized congress leaders who ignored campaign for dalit candidate praveen padvekar rsj 74 sud 02