तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. पक्ष विस्तारासाठी त्यांनी मराठवाड्यासह थेट विदर्भाकडे आगेकूच केली असून दोन माजी आमदार त्यांच्या गळाला लागले आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यातील एका माजी आमदारालासुध्दा केसीआर यांची भुरळ पडली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा >>>नागपूर : मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसचे एलआयसी, एसबीआयसमोर निदर्शने
२०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. कुठे पक्षातून तिकीट मिळविण्यासाठीची धडपड तर कुठे उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले जात आहे. जे कोणत्याच पक्षात नाहीत ते निवडणूक लढण्यास आर्थिक पाठबळासाठी नव्या आणि लोकप्रिय पक्षांच्या शोधत आहेत तर काही पक्ष अशा मातब्बर (राजकारणी) उमेदवारांना गळ घालून पक्षात सामील करून घेत आहेत. सध्या असाच एक पक्ष चर्चेत आहे. तो म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष. पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने केसीआर यांनी सध्या महाराष्ट्रात प्रवेश केला असून त्यांच्या पहिल्याच सभेत मराठवाड्यासह विदर्भातील दोन माजी आमदारानी केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातील माजी आमदारही आता केसीआर यांच्या पक्ष प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे कळते.
हेही वाचा >>>“आंदोलन कशाला करता, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन…”, प्रविण तोगडीयांचा खोचक टोला
तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून केसीआर यांचे कौतुक केले आहे. यामुळे वाघमारे केसीआर यांच्या बीआरएस पक्षात जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या चरण वाघमारे यांना भाजपने पक्षातून बेदखल केल्यानंतर ते आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा याच्या शोधात आहेत. वाघमारे यांची पुढील राजकीय खेळी आता जील्हावसीयांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे.