नागपूर : देशात एखाद्या पक्षाने विस्तारासाठी पावले उचलली तर त्याला दुसऱ्या राजकीय पक्षाची ‘ए’, ‘बी’, ‘सी’ टीम म्हणण्याची ‘फॅशन’ झाली आहे, असा टोला भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) पक्षप्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राव पुढे म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीने पक्ष विस्ताराचा अधिकार दिला आहे. ‘बीआरएस’ने प्रथम महाराष्ट्रात विस्ताराचे प्रयत्न हाती घेतले आहेत. आठ-दहा दिवसांत आम्ही मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह इतर राज्यांतही काम सुरू करणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था ढासळत असून आयात वाढून निर्यात कमी होत आहे. त्यामुळे आयात-निर्यात धोरणांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. धर्मगुरूंनी पूजापाठ करायला हवे. त्यांना राजकारणात आणून ढवळाढवळ करणे योग्य नाही. देशातील राजकीय पक्ष व नागरिकांना ‘ईव्हीएम’वर संशय असल्यास विकसित देशाप्रमाणे भारतातही ‘बॅलेट’वर निवडणूक घ्यायला हवी. केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून कोणत्या पक्ष वा नेत्याला संपवणे निंदनीय आहे. नरेंद्र मोदी यांनीही टप्प्याटप्प्याने पंतप्रधानपद मिळवले. त्यांना आजच्यासारखे दडपले गेले असते तर त्यांना सर्वोच्च पद मिळू शकले नसते. भारतात प्रत्येकाला मोफत शिक्षणाची सोय हवी. देशात ‘बीआरएस’ची सत्ता आल्यास लोकसभा, विधानसभेच्या ३५ टक्के जागांमध्ये वाढ करून त्या महिलांसाठी आरक्षित केल्या जातील, असेही राव म्हणाले.

हेही वाचा – ‘बीआरएस’ महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार; सत्ता आल्यास तेलंगणातील कृषी प्रारूप- के. चंद्रशेखर राव

लहान राज्यांचे धोरण हवे

तेलंगणासाठी आम्हाला खूप मोठा लढा उभारावा लागला. या लढ्यात मी मरता मरता वाचलो. विदर्भासाठीही मी येथे सभा घेतली होती. लहान राज्यांना आमचे समर्थन आहे. परंतु, देशात सध्या लहान राज्यांबाबत काहीही धोरण नाही. देशात लहान राज्यांच्या निर्मितीबाबत धोरण तयार करण्याची गरज असल्याचे मतही के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K chandrasekhar rao of brs expressed his opinion on evm in nagpur he said if there is doubt about evm elections should be held on ballot in india mnb 82 ssb
Show comments