काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीमुळे आयुष्य बदलेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या शेतकरी, शेतमजूर महिलेस १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या भेटीची अनिवार ओढ लागली आहे. ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होऊन राहुल गांधी यांची एकदा तरी भेट व्हावी, अशी इच्छा कलावती यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- ‘महाविकास आघाडीमुळे उद्योग व प्रकल्प राज्याबाहेर गेले’; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी २००५ मध्ये विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेतल्या. यावेळी मारेगाव तालुक्यातील जळका येथील कलावती बांदुरकर यांच्या झोपडीत राहुल गांधी पोहोचले. कलावती बांदुरकर यांचे पती परसूराम यांनी २००५ मध्ये कर्जबाजारीपणा आणि मुलींच्या लग्नाच्या चिंतेने आत्महत्या केली होती. कलावती व त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था बघून आणि व्यथा ऐकून व्यथित झालेल्या राहुल यांनी कलावती व त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत केली होती. राहुल गांधींच्या त्या भेटीने कलावती बांदूरकर अचानक प्रकाशझोतात आल्या आणि त्यांना देश, विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला. राज्य शासनानेही कलावती बांदुरकर यांना विशेष महत्त्व देत सर्व योजना त्यांच्या दारापर्यंत पोहचविल्या. त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला. राहुल यांच्या भेटीमुळे कलावती बांदुरकर यांचे जीवनच पालटून गेले.
हेही वाचा- नागपूर: जगदंबा तलवारीवरून वडेट्टीवार-मुनगंटीवार यांच्यात कलगीतुरा
राहुलमुळे आमचे दारिद्र्य दूर झाल्याची भावना कलावती आजही व्यक्त करतात. पैसा आला तरी रोजमजुरीची कामे सोडली नाही. त्या भेटीनंतर राहुल यांची कधीच भेट झाली नाही, असे त्या सांगतात. आता वय झाले, सतत आजारी असल्याने मृत्यू कधी येईल, हे सांगता येत नाही. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’निमित्ताने विदर्भात येत असल्याने त्यांची एकदा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कलावती यांनी सांगितले. त्यासाठी गावातील काही कार्यकर्ते प्रयत्नात आहेत. १४ नोव्हेंबरला वाशीम येथे राहुल गांधी पाहेचत आहेत. तिथे कलावतीबाईंची राहुल गांधी यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांची भेट नक्कीच होईल, अशी आशा कलावती यांना आहे. ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान कलावती बांदुरकर यांची मार्गात कुठे भेट घेण्याबाबत राहुल गांधी यांचे काही नियोजन आहे काय, यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांना विचारणा केली असता, सध्यातरी तसे कोणतेही नियोजन नसल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांचा दौरा नियोजित असतो, त्या पद्धतीनेच यात्रा समोर जाते, असे ते म्हणाले.