गडचिरोली : कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कुटुंबियांचे ‘एटीएम’ असून यात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाला भेट दिली. यावेळी आंबटपल्ली गावात झालेल्या सभेत त्यांनी हे आरोप केले.
२१ ऑक्टोबररोजी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाला भेगा पडल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. तेलंगणा येथे सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मेडीगड्डा धरण कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचाच भाग असल्याने या पूर्ण प्रकल्पावरच काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज २ नोव्हेंबररोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र सीमेवरील भुपलपल्ली जिल्ह्यातील आंबटपल्ली गावात सभा घेतली. सोबतच मेडीगड्डा धरणाला भेट देऊन पाहणी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकल्पात एक लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला.
हेही वाचा – चंद्रपूर : लॉयड्स मेटल कंपनीच्या वसाहतीचे अवैध बांधकाम थाबवा, काँग्रेसची मागणी
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ भारतीय सैनिकांच्या फाशीबद्दल चूप का?
या प्रकल्पातील धरणाचे निकृष्ट बांधकाम करून केसीआर यांनी कोट्यवधी लाटले, नागरिकांना मात्र, यामुळे कोणताही लाभ मिळालेला नाही. हा प्रकल्प म्हणजे ‘केसीआर फॅमिली एटीएम’ असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही काँग्रेस कार्यकर्त्यांना त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. हा परिसर गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला लागून असल्याने या भागातदेखील राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त उत्सुकता होती.