बुलढाणा : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कल्याण येथील बालिकेच्या अपहरण, अत्याचार, हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नाट्यमयरीत्या अटक केली. यानंतर या नराधमाची शेगाव येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर पोलीस त्याला घेऊन तातडीने कल्याण (मुंबई )कडे रवाना झाले.
पोलीस विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. बँक कर्मचारी असलेल्या आरोपीच्या पत्नीला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केल्यावर तिने विशाल गवळी हा शेगाव (जि. बुलढाणा ) येथे गेल्याचे सांगितले. यानंतर कल्याण पोलिसांनी याची माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि शेगाव पोलिसांना दिली होती. यावरून शेगाव पोलीस तत्काळ सक्रिय झाले.
हेही वाचा : बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
‘सलून’मधून घेतले ताब्यात
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपी विशाल याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपला चेहरा मोहरा बदलण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने संत गजानन महाराज संस्थान परिसरातील एक केशकर्तनालय ( हेअर सलून ) गाठले. मात्र त्याच्या पाळतीवर असलेले शेगाव पोलीस त्याच्यापेक्षा चाणाक्ष निघाले. त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी त्याला ‘सलून’ मध्ये गाठले! उपलब्ध ‘सिसिटीव्ही फुटेज’मध्ये अगोदर एक वाहतूक पोलीस दुकानात गेल्यावर लगेच साध्या वेशातील पोलीस घुसले आणि त्यांनी आरोपी विशाल याच्या मुसक्या आवळल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शन खाली शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील, त्यांचे सहकारी गजानन सोनटक्के, गजानन वाघमारे, गणेश वाकेकर, शांताराम खाळपे, राहुल पांडे, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवंदे, ज्ञानेश्वर राठोड यांनी ही कामगिरी बजावली.
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कल्याण येथील बालिकेच्या अपहरण, अत्याचार, हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नाट्यमयरीत्या अटक केली. (व्हिडिओ क्रेडिट – लोकसत्ता टीम) pic.twitter.com/YVlWXfQyx1
— LoksattaLive (@LoksattaLive) December 26, 2024
त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली. काल बुधवारी, पंचवीस डिसेंबर रोजी रात्री आरोपी गवळी याला अकरा वाजताच्या सुमारास शेगाव येथील सईबाई मोटे शासकीय उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्तात त्याची तिथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर मध्यरात्री कल्याण (मुंबई )पोलीस पथक गवळी याला सोबत घेऊन कल्याण कडे रवाना झाले.
हेही वाचा : शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
संपूर्ण घटनाक्रम
- २३ तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.
- अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती.अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला.
- मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली.दुसऱ्या दिवशी मुलीच्या मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला.
- मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला.शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचेही नाव समोर आले.
- विशाल गवळी याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
- आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी मोर्चा देखील काढण्यात आला काढला. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) मध्ये चालवीण्याचे आदेश कल्याण पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहे.
© The Indian Express (P) Ltd