लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करत असताना आपण आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या देशात जोपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत आहे, तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत नागपूरला संघभूमी नाहीतर दीक्षाभूमी म्हणून ठेवू हे लक्षात ठेवा, असे काँग्रेस नेते कन्हैया कुमार म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तुम्ही कितीही खून करणाऱ्यांचे गुणगान गा, पण आम्ही कायम रघुपती राघव राजाराम, पतित पवन सिताराम हे म्हणत राहू. आम्ही रोजगार द्यायला तयार आहोत, या देशातील तरुणांनो, महिलांवरील अत्याचार संपवायला आम्ही तयार आहोत. देशातील स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, हा आमचा संकल्प आहे असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-“ येणारे शंभर दिवस महत्वाचे” काय म्हणाले तेलंगणाच्या मुख्यमंत्री

कन्हैया कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. महाराष्ट्राची भूमी ही संत महात्म्यांची भूमी आहे. ज्यावेळी देशभरात इंग्रजांविरुद्ध ब्र काढण्याचीही कोणाची हिंमत नव्हती, त्यावेळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ ही गर्जना महाराष्ट्रातूनच देशभरात दुमदुमली होती. वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरांची ही भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचं काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे. पण मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याच धास्तीपोटी हे सरकार निवडणुका घेत नसल्याचे मत कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढावे लागणार आहे. यावेळी काँग्रेस नेते प्रतापगडी यांनी भाजप वर जोरदार टीका केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar criticized the government and union minister amit shah dag 87 mrj