वर्धा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सपशेल पराभूत झाला. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याची स्थिती आहे. बडे नेतेच नव्हे तर इतरही या पराभवाने सुन्न झाल्याचे पाहायला मिळते. पराभवाचे खापर आता कुणावर फुटणार, याकडे लक्ष लागून असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

काँग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा म्हणून एनएसयूआय अर्थात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या संघटनेची ओळख आहे. दिवं. श्रीकांत जिचकार यांच्या नेतृत्वात नावारूपास आलेल्या या संघटनेचे राष्ट्रीय प्रभारी म्हणून प्रखर विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार हे जबाबदारी सांभाळतात. त्यांनी व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी एका आदेशास मान्यता दिली आहे. एनएसयूआयच्या महाराष्ट्र शाखेचे प्रभारी असलेले संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अर्जुन चापर्णा व अक्षय यादव क्रांतीवीर यांनी महाराष्ट्र शाखा तडकाफडकी बरखास्त केली आहे. प्रदेश अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच संघटनेचे महाराष्ट्र मीडिया सेल, सोशल मीडिया, प्रवक्ते यांना पण बरखास्त करण्यात आले आहे. या विद्यार्थी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करणारा हा बरखास्तीचा आदेश प्रभारी कन्हैया कुमार यांच्या संमतीने काढण्यात आला असल्याचे महाराष्ट्र प्रभारी असलेल्या दोन्ही राष्ट्रीय सरचिटणीसांनी नमूद केले.

हेही वाचा >>> पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित

काँग्रेसची ही विद्यार्थी शाखा महाविद्यालय पातळीवर कार्यरत असते. विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुका लढविण्यात या संघटनेचा पुढाकार असतो. श्रीकांत जिचकार या संघटनेचे कर्तेधर्ते झाल्यावर त्यांनी निवडून चांगले युवा नेतृत्व तयार केले होते. त्यात विद्यमान राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, तसेच डॉ. सुनील देशमुख, रमेश फुके, वीरेंद्र जगताप, सुभाष कोरपे, अनिस अहमद, नाना गावंडे, रवींद्र दरेकर, राजू कोरडे, संध्या सव्वालाखे व अन्य नेत्यांचा समावेश होतो. हे सर्व बहुतेक आजही काँग्रेसमध्येच आहेत. मात्र त्यानंतर नवे नेतृत्व घडविण्याची प्रक्रियाच थांबली. या विधानसभा निवडणुकीत विद्यार्थी संघटना कुठेही दिसली नाही. किंबहुना संघटनेचे पदाधिकारी कोणते काम करीत आहे, याचीही दखल दिसली नसल्याचे म्हटल्या जाते. निवडणुकीत या विद्यार्थी संघटनेकडे वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्षच केल्याचा आरोप एका पदाधिकाऱ्याने केला. साधे बूथ सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली नव्हती. निवडणुकीस उभे उमेदवार या विद्यार्थी संघटनेची आठवण पण करीत नव्हते, असेही ऐकायला मिळाले. संघटना म्हणून स्थान नसल्याने ती बरखास्त झालेलीच बरी, अशीही टिपणी झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar dissolved all branches of congress nsui unit in maharashtra pmd 64 zws