देशद्रोहाच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या कन्हैयाकुमारच्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप याचा विचार करता विद्यार्थी नेत्यांचा राजकीय वापर होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
या राजकीय वादावादीत सर्वात जास्त फायदा कन्हैयाकुमारचा झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तो विद्यार्थी नेता आहे आणि आयोजकांच्या भूमिकेत वेगवेगळ्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना होत्या. नागपुरात येऊन संघावर थेट हल्ला करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टामुळे राजकीय पक्षांनी त्याला येथे आणले. मात्र, ज्यांनी विरोध केला ते टीकेचे धनी ठरले. शिक्षणक्षेत्रातील जाणकारांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनीही याला दुजोरा दिला. तर काहींनी तसे होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. सभा उधळून लावून हिरो बनण्याच्या नादात बजरंग दल व अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळाने सभेला आणखी महत्त्व प्राप्त झाले. त्या गोंधळानंतर कन्हैयाचे भाषण आणखी प्रभावी झाले.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कन्हैयाला नागपुरात आणल्यावर बाजी आपल्याच हाती या थाटात सभागृहातील सूत्रे हाती घेतली होती. मात्र, नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे संघ, भाजपच्या विरोधात टीका केली. कन्हैयाचा उदय झाल्यापासून भाजप व अभाविप वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गुरुवारच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयातील कन्हैयाची सभा देशासाठी किंवा जनतेच्या हितासाठी नव्हती तर राजकीय पोळी भाजून घेण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा डाव होता, असे मत अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी व्यक्त केले आहे. मात्र प्रा. रणजित मेश्राम यांच्या मते, भाजपपेक्षा संघाच्या विरुद्ध ध्रुवीकरण होत असेल तर वाईट नाही. विशिष्ट भूमिका व मानसिकता घडवणाऱ्या संघाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे विद्यार्थी कार्यकर्ते हिंदू असूनही संघाच्या विरुद्ध जावून बजरंग दल व अभाविपच्या कार्यकर्त्यांना चोप देतात हे संघीकरणाचेच ध्रुवीकरण नाही काय? ‘राष्ट्रवाद’ आणि ‘भारत माता की जय’ हे विषय उच्चांकावर असताना संघाला अशाप्रकारे विरोध होणे, त्यासाठी आक्रमक होणे, हे स्वागतार्ह आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने घेतलेल्या सभेतून विद्यार्थ्यांचे पर्यायी आव्हान उभे राहिले, असेही ते म्हणाले.
सभेचा फायदा कन्हैयाला झाल्याचे, मत प्रा. डॉ. अनिल ढगे यांनी व्यक्त केले. राजकीय पक्ष प्रत्येक घटनेत फायदे पाहतात. या पाश्र्वभूमीवर गुरुवारची सभा राजकीय पक्षांच्या शैलीला शोभणारी होती. ज्या वातावरणात ही सभा झाली त्याचा फायदा भाजपच्या जवळच्या संघटनांना कमी आणि कन्हैयालाच जास्त झाला. राहिली गोष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीची तर ते ज्या अवस्थेतून जात आहेत त्याचा विचार करता त्यांच्याही पदरात काही ना काही पडले. हे वातावरण ते पुढेही कसे टिकवू शकतात, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे राहील.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. रामचंद्र तुपकरी म्हणाले, मोदी सरकार येण्यापूर्वीपासून देशात उत्स्फूर्त प्रतिक्रियेची लाट होती. देशात जे काही सुरू आहे ते अयोग्य असल्याची लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे लोक कधी अण्णा हजारे तर कधी केजरीवाल यांच्या मागे जातात. तसेच कन्हैयाचे झाले. मोदींच्या विरोधातील सोनिया गांधी, राहुल गांधी असो की शरद पवार यांच्यासारखे नेते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे सध्या लोकांच्या भावनांना हात घालणारा कन्हैया एकमेव आहे. त्यालाही खूप सामाजिक व आर्थिक बाबींची माहिती आहे असे नाही पण, तो जनमाणसाला अपिल करतो एवढेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा