लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलात एवढ्या मोठ्या संख्येने तरुणी सहभागी होत आहेत. महिलांच्या अंगावर खाकी वर्दी बघून देश पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री वाटते. प्रशिक्षण पूर्ण करून समाजाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या महिला पोलिसांना माझा सॅल्यूट. भारताची सुरक्षा योग्य हातात आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केली.

ते शनिवारी दुपारी नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी जगज्जेत्या कपिल देवला भेटण्यासाठी १२०० महिला पोलीस कर्मचारी भर पावसात चिंब होऊन उभ्या होत्या. यावेळी महिला पोलिसांचा आनंद गगनात मावत नव्हता.

आणखी वाचा-अरे बापरे! चक्क जिप्सी चालकाच्या शर्टात निघाला साप… कुठे घडला हा धक्कादायक प्रकार? वाचा…

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे क्रिकेटपटू कपिल देव हे शनिवारी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. तत्पूर्वी ते पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. कपिल देव यांनी प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, समाजाच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे आजच कणखर होऊन बाहेर पडा. मला भेटण्यासाठी एवढ्या पावसात तुम्ही उपस्थित आहात, हे बघून माझे मन भरून आले आहे. त्यामुळे मीसुद्धा पावसातच उभे राहून तुमच्याशी संवाद साधणार आहे.

समाजाच्या रक्षणाचे व्रत स्वीकारल्यानंतर ऊन, वारा, पाऊस याची चिंता करायची नसते. महिला पोलिसांनी स्वतःमधील शक्ती आणि क्षमता ओळखा आणि स्वतःला झोकून देऊन कर्तव्य बजावा. तुमच्या अंगातील वर्दीवर मनापासून प्रेम करा, मग बघा येणारा काळ तुमचाच आहे. प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांनी कपिल देव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्वच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-बुलढाणा : भूतबाधा झाल्याचे समजून महिलेस अमानुष मारहाण, कथित ‘शिवा महाराज’चा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

एवढ्या मोठ्या क्रिकेटपटूशी संवाद साधता आला, हे माझे भाग्य आहे. माझ्यासाठी ही सुवर्ण संधी होती. चक्क कपिल देव यांनी सेल्फी काढली. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. समाज रक्षण करण्यासाठी त्यांचे शब्द प्रेरणादायी आहेत. -संध्या धामडे (महिला पोलीस प्रशिक्षणार्थी-गोंदिया)

पोलीस प्रशिक्षण घेत असतानाच थेट कपिल देव यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अगदी सहजपणे आमच्याशी संवाद साधला. भविष्यात असा योग येईल, असे वाटत नाही. पण आजचा दिवस कपील देव यांच्यामुळे कायमस्वरुपी स्मरणात राहणार. -वर्षा साळूंखे (सांगली)

क्रिकेटपटू कपिल देव यांची भरपावसात भिजून वाट बघत होती. स्टेजव उभे राहून नव्हे तर चक्क आमच्यासमोर उभे राहून संवाद साधला, हा क्षण माझ्यासाठी अंगावर शहारा आणणारा होता. ही भेटसुद्धा वर्दीमुळे शक्य झाली आहे. -पूजा खडसे (वाशिम)